बेळगाव शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने झेपावत आहे. शहरात विकासकामे हाती घेण्यात आली.. परंतु सरकारी काम आणि थोडे थांब..! अशी नेहमीची रड असणारी सरकारी कामे शहरातच इतक्या कूर्मगतीने सुरु असतील तर ग्रामीण भागाची काय तऱ्हा असेल हे नव्याने सांगणेच नको. परंतु नवल म्हणजे जिथे सरकारी सुविधांची वानवा आहे त्या दुर्गम भागात चक्क कोरोनाने शिरकाव केला आहे.
हि बातमी आहे जांबोटी परिसरातील. ज्या गावात जाण्यासाठी रस्त्याचा पत्ता नाही अशा गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. जांबोटी परिसरातील एका ४५ वर्षीय इसमाला कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शहरासोबतच आता ग्रामीण भागातही कोरोनाविषयी खबरदारी घेणे महत्वाचे ठरत आहे.
कोरोनाचे पर्व सुरु झाल्यापासून जांबोटी आणि कणकुंबी परिसरात स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन करण्यात आले. सुरक्षा आणि खबरदारीच्या उपाययोजनांसह अनेक गोष्टी अमलात आणल्या गेल्या. या दरम्यान बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनाही प्रवेश देण्यात येत नव्हता. परंतु जांबोटी परिसरातील चापोलीसारख्या अत्यंत दुर्गम भागात कोरोना रुग्ण आढळणे हि खळबळ माजविणारी गोष्ट असून समोर आलेल्या या “पॉझिटिव्ह” केसमुळे नागरिकांची मनःस्थिती निगेटिव्ह होत आहे.
चापोलीमध्ये आढळून आलेला हा रुग्ण गोव्यात एका हॉटेलमध्ये काम करत होता. मार्चपासून हा व्यक्ती घरातच होता. परंतु देशात सुरु झालेल्या अनलॉक प्रक्रियेनंतर काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. आणि या दरम्यान हा संबंधित रुग्ण हल्ल्याळ येथे गेला. या दरम्यान या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मागील आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात तपासणीसाठी घेण्यात आलेल्या घशातील द्रावाच्या चाचणीतून या रुग्णाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या बातमीनंतर जांबोटी परिसरात तातडीने बाजापेठ बंद करण्यात आली. आणि चापोलीला जाणारे मार्गही बंद करण्यात आले आहेत. संबंधित रुग्ण गेल्या आठवडाभरात खानापूर शहरात अनेक ठिकाणी फिरला असल्याने त्याच्या संपर्कात आणखी किती जण आले आहेत, याची माहिती काढणे आणि यानंतर कितीजण संसर्गजन्य होतील याचा विचार करून तालुका प्रशासनाच्या डोकेदुखीत आणखी भर पडली आहे.
शहरात बीम्स मध्ये होत असलेले उपचार तर दररोज सर्वसामान्य नागरिक पाहतच आहेत. परंतु आता तालुक्यातही अशापद्धतीने रुग्णसंख्या वाढत गेली तर मात्र बीम्सच्या भरवशावर राहणे नागरिकांना कितपत फायद्याचे ठरेल, हे आता येणार काळ आणि प्रशासन ठरवेल.