मुसळधार पावसात नानावाडी परिसरातील पूरपरिस्थितीचा धोका टाळावयाचा असेल तर न्यू गुड्सशेड रोड येथील नाल्यामधील पाण्याचे पाईप्स आणि इलेक्ट्रिक कॅबल्ससह साचलेला गाळ व केरकचरा महापालिकेने तात्काळ हटवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता महापालिका विविध उपाययोजना राबवित असली तरी न्यू गुड्सशेड रोड येथील नाल्यामधील पाण्याचे पाईप्स आणि इलेक्ट्रिक कॅबल्ससह साचलेला गाळ व केरकचरा हटविण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. या नाल्यातील पाण्याचे पाईप आणि आणि केबल्सचे अडथळे तसेच विविध ठिकाणी साचलेल्या गाळ व केरकचऱ्यामुळे मागील वर्षी सदर नाल्यातील पाणी विविध भागातील घरांमध्ये शिरले होते. परिणामी नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागला होता. विशेषत: मराठा कॉलनी, नानावाडी परिसर, महात्मा गांधी कॉलनी आणि इंद्रप्रस्थनगर आदी भागात पाणीच पाणी झाले होते. येथील काही नाल्यांची स्वच्छता व्यवस्थित करण्यात आली नव्हती. नाल्यात असलेले पाण्याचे पाईप्स, इलेक्ट्रिक कॅबल्स आणि कचऱ्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला होता.
यासाठी यंदा पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने नाला स्वच्छता मोहीम जोरदारपणे चालविली होती. नाल्यामधील अडथळे हटवून स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. काँग्रेस रोडशेजारी आणि मराठा मंदिरशेजारी नाल्यामध्ये असलेल्या पाण्याचे पाईप्स व इलेक्ट्रिक कॅबल्स हटविण्यात आल्या आहेत. पूरस्थिती निर्माण होऊ नये याकरिता ही आवश्यक खबरदारी घेण्यात आली असली तरी न्यू गुड्सशेड रोड परिसरातून वाहणाऱ्या नाल्यामधील पाण्याचे पाईप्स, इलेक्ट्रिक कॅबल्स आणि मोबाईल केबल्स हटविण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रेल्वे मार्गावर असलेल्या पुलाची स्वच्छता करण्यात आलेली नाही. पावसाळ्यात सदर नाल्यामधून नानावाडी परिसरातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असते. या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नानावाडीमधून येणाऱ्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी नानावाडी परिसरात पूरस्थिती निर्माण होऊन घराघरांमध्ये पाणी शिरते. दरवर्षी मराठा कॉलनी आणि नानावाडी परिसरातील नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका सहन करावा लागतो. मात्र आतापर्यंत या समस्येचे निवारण करण्याकडे मनपाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे.
न्यू गुड्सशेड रोड परिसरातून वाहणाऱ्या नाल्यामध्ये पाचहून अधिक मोबाईल केबल्स व इलेक्ट्रिक कॅबल्स आहेत. दीड फूट आकाराची डेनेजवाहिनी नाल्याच्या तोंडावर आहे. त्यामुळे या ठिकाणी गाळ व कचरा साचत असून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. रेल्वे मार्गाच्या खाली देखील कचरा साचला असून, या ठिकाणी विविध वाहिन्यांचा अडथळा निर्माण झाला आहे.
या नाल्यामधील केरकचरा व अन्य अडथळा हटविण्यासाठी येथील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या, परंतु अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे डेक्कन हॉस्पिटलसह परिसरात पाणी शिरत आहे. परिसरातील रहिवाशांना येथील समस्येचा सामना करावा लागत आहे. नानावाडी परिसरातील नागरिकांनादेखील याचा फटका बसत आहे. तेंव्हा आता तरी न्यू गुड्सशेड रोड येथील नाल्यामधील पाण्याचे पाईप्स आणि इलेक्ट्रिक कॅबल्ससह साचलेला गाळ व केरकचरा तात्काळ हटवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.