कोरोनाचा कहर सुरू असताना भारतनगर – वडगाव येथे सध्या डेंग्यूचे देखील थैमान सुरू झाले असून प्रशासनासह महापालिकेने याकडे तात्काळ लक्ष देऊन डेंग्यूला आळा घालण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कोरोनाचा कहर सुरू असताना आता शहरात डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये डेंग्यू आणि टाइफाईडमुळे शहरात दोघा मुलांचा मृत्यू झालेला असताना अद्यापही डेंग्यूच्या प्रादुर्भावाकडे डोळेझाक केली जात असल्याने नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या बेळगाव शहरात विशेष करून भारतनगर परिसरात डेंग्यूचे थैमान सुरू आहे. या भागातील 5 – 6 जणांना डेंग्यूची लागण झाली असल्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी एका रुग्णाला आजच डिस्चार्ज मिळाला आहे. भारतनगर भागातील स्वच्छतेकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे याठिकाणी डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्याचा आरोप केला जात आहे.
भारतनगर परिसरातील गटारी आणि कचऱ्याची वेळच्यावेळी साफसफाई केली जात नसल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. याखेरीज काही भागात दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. या भागातील नागरिक डेंग्यूमुळे आजारी पडत असताना बेळगाव महापालिका आणि आरोग्य खाते मात्र याबाबतीत सुस्त दिसत आहे. जीवघेण्या डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खरेतर बेळगाव महानगरपालिकेने तात्काळ सक्रिय होण्याची गरज आहे.
दरम्यान, महापालिकेच्या कचरा उचल करणाऱ्या एका ठेकेदाराकडूनच भारतनगर भागात डुकरे पाळली जात आहेत. या ठेकेदाराने नुकतीच आणखी कांही डुकरे खरेदी केल्याचे समजते. या डुकरांमुळे संबंधित भागातील अस्वच्छतेत आणखीनच भर पडत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. तेंव्हा महानगरपालिकेने भारतनगर येथील डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी. तसेच या ठिकाणच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.