हायस्ट्रीट कॅम्प बेळगाव येथे भर रस्त्यात बेशुद्ध पडलेल्या एका इसमाला कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांनी मदतीचा हात देऊन त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित पाठवून दिले. तसेच सद्य परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक कुटुंबियांनी आपल्या घरातील वयस्कांची काळजी घ्यावी, असे आवाहन साजिद शेख यांनी केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हायस्ट्रीट कॅम्प येथे कंग्राळ गल्ली येथील लक्ष्मण चौगुले हे वयस्क इसम भोवळ येऊन रस्त्यावर पडले होते. रस्त्याच्या मधोमध एक इसम भोवळ येऊन कोसळल्याचे समजताच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते साजिद शेख यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेख यांनी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने संबंधित इसमाला रस्त्याकडेला नेऊन ठेवले. त्याचप्रमाणे आपला मित्र हाय स्ट्रीट येथील कोठारी मेडिकल्सचे मालक चेतन कोठारी यांच्या मदतीने ग्लुकोज, पाणी आदींच्या वापराद्वारे प्राथमिक उपचार करून लक्ष्मण चौगुले यांना भानावर आणले.
चौगुले भानावर आल्यानंतर साजिद शेख यांनी त्यांना आपण ठीक आहात घाबरू नका असे सांगून दिलासा दिला. तसेच त्यांच्या कंग्राळ गल्ली येथील कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना स्वगृही सुखरूप पाठवून देण्याची व्यवस्था केली. मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण चौगुले यांच्या पोटात सकाळी उठल्यापासून अन्नाचा एक कणही नव्हता उपाशीपोटी ते आपल्या मित्राला भेटायला निघाले होते.
कोरोना सध्या मृत्युच्या स्वरूपात घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे अशा परिस्थितीत सर्वांनी आपापल्या घरातील आपल्या वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी, त्यांच्यावर लक्ष ठेवावे अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन साजिद शेख यांनी केले आहे.