कोरोनाव्यतिरिक्त होणाऱ्या अनेक आजारांमध्ये नागरिकांना दवाखान्याचे दरवाजे ठोठावावे लागत असून साधारण सर्दी खोकल्यासाठीही औषधे उपलब्ध होत नाहीत, यामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे. नागरिकांची हि गैरसोय टाळण्यासाठी आज बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
मार्च महिन्यापासून कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. सर्दी, खोकला, ताप, आणि श्वासोच्छ्वासात होणार त्रास हि या रोगाची लक्षणे सांगितली गेली. हि लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांच्या घशातील स्वॅब टेस्ट घेण्यात येऊन त्यांच्यावर ताबडतोब आयसोलेशन कक्षात उपचार सुरु करण्यात आले. तर काहींना होम क्वारंटाईन आणि संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले.
परंतु या दरम्यान इतर आजारांसाठी मात्र डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवणे पसंत केले. आणि सामान्य आजारांसाठी नागरिकांची तारांबळ उडू लागली. कोरोनाव्यतिरिक्त ज्या नागरिकांना सामान्य सर्दी खोकला झाला, त्यांना औषध मिळणेही दुरापास्त झाले.
बेळगाव परिसरात अनेक औषधालये आहेत. या औषधालयांमधून डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषधे देण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. तर आयमोल, क्रोसीन, सिनारेस्ट, विक्स ऍक्शन ५०० तसेच खोकल्यावरील सामान्य औषधेही उपलब्ध होत नाही आहेत. काही दवाखान्यांमधून डॉक्टरच जागेवर नसल्याचे पाहावयास मिळत आहे. आणि त्यातच पावसाळ्याचा मौसम असून यादरम्यान हवामानातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला, ताप यासारख्या सर्व सामान्य आजारांवरही औषधे आणि उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. आणि जी खासगी रुग्णालये सुरु आहेत, त्याठिकाणी उपचाराचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत.
या सर्व गैरसोयींनबद्दल सामान्य जनतेची नाहक होणारी धावपळ लक्षात घेऊन प्रशासनाने त्वरित यावर तोडगा काढावा, आणि सर्वसामान्य आजारासाठी औषधे उपलब्ध होतील, याकडे लक्ष पुरवावे, तसेच औषधालयांना हि औषधे उपलब्ध करून देण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आज शिवसेना, सीमाभाग (बेळगाव जिल्हा) च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख (बेळगाव जिल्हा – सीमाभाग) बंडू केरवाडकर, शिवसैनिक वैजनाथ भोजन, नारायण पाटील, बाळू नाईक, मयुरेश काकतकर, दीपक मस्के, अनिकेत दासांनी, विजय गवाने, अतुल सांबरेकर, भरत जाधव, वासू समाजी आदी उपस्थित होते.