कोरोना वॉरियर्स आशा कार्यकर्त्यांसह अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मानधनात वाढ केली जावी, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांचे निवेदन आज गुरुवारी सकाळी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेले उपरोक्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सध्याच्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आशा कार्यकर्त्या डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना विरुद्ध लढा देत आहेत.
अतिशय अल्प मानधनाच्या मोबदल्यात जनहिताचे हे कार्य करताना आशा कार्यकर्त्यांची मोठी आर्थिक ओढाताण होत आहे. तेव्हा आशा कार्यकर्त्यांच्या मानधनामध्ये किमान 15 हजार रुपयांपर्यंत वाढ केली जावी. आशा कार्यकर्त्यांना प्रमाणे अंगणवाडी कार्यकर्त्यांचे मानधन देखील वाढविली जावे.
माजी महापौर संज्योत बांदेकर यांच्या अधिकारपदाच्या कालावधीत शहरात छ. शाहू महाराजांचा पुतळा उभारण्याचा ठराव संमत झाला होता. त्यासाठी निधी देखील मंजूर झालेला आहे. तथापि अद्याप पर्यंत छ. शाहू महाराजांच्या पुतळ्याची उभारणी झालेले नाही. तेंव्हा छ. शाहू महाराजांच्या पुतळ्याससह भगवान गौतम बुद्धाच्या अश्वारूढ पुतळ्याची शहरात उभारणी केली जावी, अशा आशयाचा तपशील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
सदर निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजू पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.