शहरातील खडेबाजार पोलिसांनी खंडणीप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृह व्यवस्थापन सतर्क झाले असून त्यांनी कैद्यांची कोरोना तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
खडेबाजार पोलिसांनी खंडणी प्रकरणी नुकतेच दोघा आरोपींना अटक करून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी दोन दिवस महाराष्ट्र पोलिसांच्या रिमांडमध्ये होते. त्यावेळी त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते.
खडेबाजार पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी केल्यानंतर आज गुरुवारी सकाळी संबंधित दोन आरोपींपैकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे कारागृह व्यवस्थापनाला कळविण्यात आले आहे.
परिणामी त्या आरोपीची हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रवानगी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून हिंडलगा कारागृहामध्ये कैद्यांची कोरोना तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.