कोणताही प्रवास इतिहास अर्थात ट्रॅव्हल हिस्टरी नसताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणे हा “कम्युनिटी ट्रान्समिशन” अर्थात सामुदायिक संसर्गाला प्रारंभ झाल्याचा संकेत आहे. गेल्या 8 -10 दिवसात जिल्ह्यात सामुदायिक प्रादुर्भावाला प्रारंभ झाला असून येणारे चार आठवडे अत्यंत निर्णायक आहेत, असे स्पष्ट मत बेळगाव जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुनियाळ यांनी व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगसह सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही डॉ. मुनियाळ यांनी केले आहे.
गेल्या सात जुलै रोजी जिल्ह्यात एकाच वेळी 20 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. या सर्व रुग्णांचा कोणताही प्रवास इतिहास नाही ही बाब धोक्याची सूचना देणारी आहे. हिंडलगा येथील 15 वर्षीय बालिका कोरोनाग्रस्त आढळली आहे प्रवास इतिहास नसलेल्या या मुलीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध जारी आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात सामुदायिक संसर्ग हा असा टप्पा आहे ज्यामध्ये संसर्गाचा उगम शोधता येत नाही मात्र लोकांमध्ये रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होतो.
दरम्यान, कर्नाटक शासनाने राज्यात अद्याप कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाले नसल्याचे मंगळवारी केंद्रीय पथकाला सांगितले आहे. या उलट राज्याचे मंत्री मधुस्वामी यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यात कोरोना कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याची भीती व्यक्त केली असून परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे म्हंटले आहे.
राज्याच्या आरोग्य खात्याचे मंत्री बी. श्रीरामलू यांनी मात्र राज्यात कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाल्याच्या वृत्ताचा साफ इन्कार केला आहे. राज्यात अद्याप तिसऱ्या टप्प्यातील कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालेले नाही. आम्ही अजून देखील दुसऱ्या (स्थानिक संसर्ग) आणि तिसऱ्या (सामुदायिक संसर्ग) टप्प्याच्या मधोमध आहोत, असे मंत्री श्रीरामलू यांनी स्पष्ट केले आहे. तथापि आगामी काही आठवडे अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने सर्वांनी कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहनही मंत्र्यांनी केले आहे.