बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाच्या एका सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला कोरोनाची लागण झाली असल्याने अशोक नगर येथील बुडा कार्यालय सील करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्याच इमारतीतील स्मार्ट सिटी योजनेचे मुख्य कार्यालय देखील आता कांही दिवस बंद ठेवावे लागणार आहे.
देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यानंतर विविध राज्यातून बेळगावात येणाऱ्यांची नोंद ठेवणे व त्यांना काॅरंटाईन करणे या कामासाठी जिल्हा प्रशासनाकडून समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. संबंधित कोरोनाग्रस्त सहाय्यक कार्यकारी अभियंता या अधिकाऱ्यांपैकी एक आहे. तो दररोज सांबरा विमानतळावर जाऊन सेवा बजावत होता. त्याठिकाणीच हा अभियंता एखाद्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात आला असावा असा कयास आहे. सदर सहाय्यक कार्यकारी अभियंता कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्याचे सहकारी अधिकारी आणि कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोरोनाग्रस्त अभियंता गेल्या आठवड्यात बुडा आयुक्त व नगर रचना अधिकाऱ्यांसमवेत अनगोळ येथील निवासी योजनेसाठी आरक्षित जागेची पाहणी करण्यास देखील गेला होता. एकंदर त्याचा बऱ्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क आला आहे त्यामुळे आता त्या सर्वांना होमकाॅरंटाईन व्हावे लागणार आहे.