न्यायालयीन कामकाज त्वरित पूर्ववत सुरु करण्याबरोबरच वकिलांना बिनव्याजी 5 लाख रुपयाचे कर्ज द्यावे, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. जी. मूळवाडमठ यांनी समस्त वकीलवर्गाच्यावतीने सदर निवेदन पंतप्रधानांना पाठवले आहे. गेल्याचार महिन्यापासून न्यायालयीन कामकाज बंद असल्याने वकीलावर्गाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. वकिलीच्या व्यवसाया खेरीज अन्य आर्थिक स्रोत नसल्याने बहुतांश वकिलांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अनेक ज्युनियर्स अर्थात वकिलांच्या सहाय्यक वकिलांची कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. सरकारने अनेक वर्गांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
त्याप्रमाणे वकिलांना देखील आर्थिक मदत जाहीर केली जावी किंवा प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज मंजूर करावे. त्याचप्रमाणे न्यायालयाचे कामकाज त्वरित सुरु केल्यास वकिलांना मदत होईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लॉक डाऊनमुळे वकिलांवर आणि त्यांच्या सहाय्यकांवर कोसळलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन बेळगाव बार असोसिएशन वेळोवेळी संबंधितांना आपल्यापरीने सहाय्य करत आहे. मध्यंतरी बार असोसिएशनतर्फे आर्थिक अडचणीत आलेल्या वकील आणि त्यांच्या सहाय्यकांसाठी जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता.
मात्र तब्बल चार महिने होत आले तरी परिस्थिती “जैसे थे” असल्यामुळे बेळगाव बार असोसिएशनने आता थेट पंतप्रधानांकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.