गेल्या फेब्रुवारी महिन्यात सरासरी 40 हजार प्रवाशांची ये-जा असणाऱ्या बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची सरासरी कोरोनाच्या तडाख्यामुळे आता दरमहा जवळपास 10 हजार इतकी खालावली आहे. सध्या एकूण सरासरीच्या एक चतुर्थांश (1/4) प्रवासी विमान सेवेचा लाभ घेत असून सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता प्रवाशांची संख्या पुन्हा 40 हजार इतकी पूर्वपदावर येण्यासाठी पुढील वर्षाची वाट पहावी लागणार असल्याची माहिती विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार मौर्य यांनी दिली.
कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे बंद पडलेली बेळगांव विमानतळावरील विमान सेवा गेल्या 25 मेपासून पूर्ववत सुरू झाली आहे. तेंव्हापासून ते आत्तापर्यंतच्या फ्लाईट ऑपरेशन्स अर्थात विमान उड्डाण कार्य आणि प्रवासी संख्येसंदर्भात “बेळगाव लाइव्ह”शी बोलताना विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक मौर्य यांनी उपरोक्त माहिती दिली. राजेशकुमार मौर्य यांनी दिलेल्या तपशीलवार माहितीनुसार, कोरोनामुळे विमानसेवा बंद होण्यापूर्वी म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत बेळगाव विमानतळावरील विमान सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या सुमारे 40 हजार इतकी होती. आता गेल्या दि. 25 मार्चला विमानसेवा पूर्ववत सुरू होऊन काल शनिवार दि. 11 जुलैपर्यंत 48 दिवस झाले आहेत.
यापैकी पहिल्या 46 दिवसांच्या कालावधीतील फ्लाइट ऑपरेशन्स आणि प्रवाशांची संख्या यांचा आढावा घेतला असता पहिल्या दिवशी दि. 25 मे रोजी बेळगाव विमानतळावरून आगमन व प्रस्थान अशी 5 विमान उड्डाण कार्ये अर्थात फ्लाइट ऑपरेशन्स झाली आणि याचा 74 प्रवाशांनी लाभ घेतला. त्यानंतर दि. 26 मे रोजी फक्त एका विमानाची दोन फ्लाइट ऑपरेशन्स झाली आणि याचा 36 प्रवाशांनी लाभ घेतला. पुढे दि. 29 मेपर्यंत सुरु असलेल्या विमान सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची सरासरी 100 च्या आत होती. तथापि दि. 1 जूनपासून मात्र प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आणि पहिल्यांदाच प्रवाशांच्या संख्येने 250 चा टप्पा ओलांडला. या दिवशी म्हणजे 1 जून रोजी विमानांची 11 फ्लाइट ऑपरेशन्स झाली, याचा 260 प्रवाशांनी लाभ घेतला. त्यानंतर पुढील तीन दिवस म्हणजे दि.4 जूनपर्यंत रोडावलेली प्रवाशांची संख्या दि. 5 जून रोजी पुन्हा वाढली. या दिवशी 6 आगमन – 6 प्रस्थान अशा एकूण 12 फ्लाईट ऑपरेशन्स झाल्या याचा 298 प्रवाशांनी लाभ घेतला.
विमान सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतरच्या 28 व्या दिवशी म्हणजे दि. 13 जून रोजी सर्वाधिक 526 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरील विमान सेवेचा लाभ घेतला. या दिवशी एकूण 14 फ्लाइट ऑपरेशन्स झाली. 13 जूनपासून 29 जून पर्यंतच्या कालावधीत प्रवाशांची संख्या कमी झाली असली तरी ती 400 च्या आसपास होती. या पद्धतीने 36 व्या दिवसापर्यंत म्हणजे दि. 29 जून 2020 पर्यंत बेळगाव विमानतळावरील विमान सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांच्या एकूण संख्येने 10 हजाराचा टप्पा ओलांडला होता. तसेच या कालावधीत एकूण 400 फ्लाईट ऑपरेशन्स पूर्ण झाली होती. त्यानंतर पुढील दहा दिवसात प्रवाशांची रोजची संख्या सरासरी 500 इतकी होती.
गेल्या गुरुवार दि. 9 जुलै 2020 पर्यंत म्हणजे विमान सेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतरच्या 46 व्या दिवसापर्यंत बेळगाव विमानतळावर एकूण 547 फ्लाइट ऑपरेशन्सद्वारे प्रवाशांच्या संख्येने 15 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. या दिवशी दि. 9 जुलै रोजी विमानांची 17 फ्लाईट ऑपरेशन्स झाली आणि एकूण 446 प्रवाश्यांचे आगमन व प्रस्थान झाले.
गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये बेळगाव विमानतळावरील प्रवाशांचा आराखडा 40 हजारापर्यंत पोचला होता. कोरोना प्रादुर्भावाचा अडथळा आला नसता तर मार्चमध्ये प्रवाशांच्या या संख्येने 40 हजाराचा टप्पा देखील ओलांडला असता आणि जून – जुलैपर्यंत प्रवाशांची संख्या 45 हजाराच्या पुढे गेली असती, असे राजेश कुमार मौर्य यांनी स्पष्ट केले. गेल्या 48 दिवसातील एकूण प्रवासी संख्येचे रूपांतर 30 दिवसात केल्यास ती जवळपास 10 हजारच्या आसपास होते. ही संख्या गेल्या फेब्रुवारीतील पूर्वीच्या प्रवासी संख्येच्या तुलनेत एक चतुर्थांश इतकी आहे,असे त्यांनी सांगितले. प्रवाशांची संख्या 40 हजार इतकी पूर्ववत होण्यास आणखी किती कालावधी लागेल? या प्रश्नाला उत्तर देताना सध्याची परिस्थिती पाहता प्रवासी संख्या पूर्ववत फुलफ्लेज होण्यास पुढील वर्षाची वाट पाहावी लागणार असल्याचे बेळगाव विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार मौर्य यांनी शेवटी स्पष्ट केले.