Monday, December 23, 2024

/

बेळगाव विमानतळावर “अशी” आहे कोरोना संदर्भातील उपायोजना

 belgaum

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या मार्गदर्शक सूचीचे तंतोतंत पालन करून बेळगाव विमानतळावर कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया दररोज अत्यंत काटेकोररित्या पार पाडल्या जात आहेत. त्याचप्रमाणे उपाययोजनांमध्ये नव्याने कांही बदल देखील करण्यात आले आहेत

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी संदर्भात सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून बेळगाव विमानतळावर पार पाडल्या जात असलेल्या प्रक्रियांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावाचा प्रारंभी विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगनजीक कोणत्याही वाहनाला फिरकू दिले जात नव्हते. प्रवाशांना पार्किंगमध्येच आपली वाहने थांबवावी लागत होती. मात्र आता नियम आणखी कडक करताना टर्मिनल बिल्डिंगपासून आणखी दूर अंतरावर वाहने थांबविली जात आहेत.
डिपार्चर अर्थात प्रस्थान करणाऱ्या प्रवाशांसाठी टर्मिनल बिल्डिंगच्या कॅनोपी एरियामधील पॅसेजमध्ये दोन भाग करण्यात आले असून यापैकी एका भागामध्ये प्रथम आरोग्य खात्याच्या वैद्यकीय पथकाकडून प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. त्यानंतर दुसऱ्या भागातील बंदिस्त अशा पॅसेंजर झोनमध्ये प्रवाशांच्या कागदपत्रांसह आरोग्य सेतू व सेवा सिंधू ॲप संदर्भातील तपासणी केली जाते. या दोन्ही भागात प्रवाशांना ताटकळत थांबावे लागेल लागू नये म्हणून सोशल डिस्टंसिंगच्या खुणा केलेल्या आसनांची व्यवस्था केलेली आहे. सोशल डिस्टंसिंगचे पालन करत एकेकाची कागदपत्रांची तपासणी वगैरे झाल्यानंतर पुढच्या टप्प्यात प्रवाशांच्या सुटकेस आदी प्रवासी साहित्यांचे स्प्रेईंगद्वारे निर्जंतुकीकरण केले जाते. बोर्डिंग पास दाखवून प्रवाशांनी टर्मिनल बिल्डिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर 3 फुटाच्या अंतराने जमिनीवर सोशल डिस्टंसिंगचे मार्किंग करण्यात आलेले आहे. त्याचे पालन करून प्रवाशांनी चेकिंग काऊंटरकडे जावयाचे आहे.

Air port
Air port

चेकिंग काऊंटरच्या ठिकाणी एक नवा बदल करण्यात आला असून काऊंटर आणि प्रवाशाच्यामध्ये एक कांच बसविण्यात आली आहे. ज्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांचा म्हणजे ग्राऊंड स्टाफचा प्रवाशांशी थेट संपर्क येणार नाही. प्रवाशांनी आपला बोर्डिंग पास वगैरे आवश्यक कागदपत्रे त्या काचेवर ठेवून आतील ग्राऊंड स्टाफला दाखवायची आहेत. बेळगाव विमानतळावर प्रत्येक विमान कंपन्यांसाठी असे चेकिंग काऊंटर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या सर्व ठिकाणी प्रवाशांसाठी आसन व्यवस्था आहे. चेकिंग काऊंटरवरून प्रवाशी टर्मिनल बिल्डिंगमधून बाहेर पडून विमानाकडे जाण्यापूर्वी प्रस्थानाच्या दारात पीपीटी पोशाख घातलेल्या सुरक्षा रक्षकांकडून त्यांची तपासणी केली जाते. बोर्डिंग गेटमधून बाहेर पडल्यानंतर विमानात जाण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. या पद्धतीने टर्मिनल बिल्डिंगमध्ये शिरताना आणि बाहेर पडताना अशी दोन वेळा प्रवाशांची काटेकोर आरोग्य तपासणी केली जाते.

Air port
Air port

परगावाहून विमानतळावर आगमन झालेल्या प्रवाशांसाठी अराईव्हलच्याठिकाणी टर्मिनल इमारतीबाहेर जमिनीवर सोशल डिस्टंसिंगचे मार्किंग करण्यात आले आहे. त्यांचे पालन करून इमारतीत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे प्रथम थर्मल स्कॅनिंग केले जाते. याखेरीज प्रवाशांचे काॅरंटाईन स्टेटस तपासणी, स्टॅम्पिंग वगैरे प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी केली जाते. विमानतळावर दोन विमाने आलेली असल्यास अराईव्हल गेटच्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवाशांना बसता यावे यासाठी त्या भागात आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. थर्मल स्कॅनिंग आदी सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंग बाहेर पडता येऊ शकते.

उपरोक्त सर्व प्रक्रिया सरकारच्या मार्गदर्शक सूचीचे तंतोतंत पालन करून काटेकोरपणे पार पाडली जात असल्याचे बेळगाव विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार मौर्य यांनी “बेळगाव लाईव्ह”ला सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांची विशेष करून वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा केली. यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य खात्याला धन्यवाद देण्याबरोबरच मौर्य यांनी विमानतळ इमारतीत पीपीटी पोषाख घालून प्रवाशांची तपासणी करणाऱ्या सुरक्षा रक्षकांबद्दलही प्रशंसोद्गार काढले. सध्या हे सुरक्षारक्षक त्यांच्या मुख्यालयाकडून देण्यात आलेले पीपीटी पोशाख परिधान करत असले तरी लवकरच आमच्याकडून आम्ही त्यांना तसे पोशाख उपलब्ध करून देणार आहोत, अशी माहितीही राजेशकुमार मौर्य यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.