जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून अथणी तालुक्यात मात्र कोरोना बाधितांच्या आकड्याने उच्चांकी गाठली आहे.
अथणी तालुक्यात 550 हून अधिक जण कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता अथणी तालुक्यातील परिस्थिती भयावह झाल्याचे दिसून येत आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने कोणीही घाबरून न जाता कोरोनावर मात करु व नियमांचे पालन करा असे आव्हान केले आहे.
त्यामुळे अथणी तालुक्यातील वाढती संख्या भीतीदायक असली तरी नियमांचे पालन केल्यास हा आकडा कमी करता येईल असे सांगण्यात येत आहे. बेळगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले असून शनीवारी अथणी तालुक्यात तब्बल 170 हून अधिक कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे येथील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शनिवारी बेळगाव जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील अथणी तालुक्यातील काहींचा समावेश आहे.
तालुक्यात मृतांची संख्या ही वाढतच चालली असल्याने हा तालुका सीलडाऊन करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. परिणामी सध्या तालुक्यातील आकडेवारी 550 वर असली तरी रविवारी मात्र हा आकडा सातशे पार करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येने उच्चांकी गाठत चारशेहून अधिक कोरोना बाधित आढळले तर हा आकडा रविवारीही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अथणी तालुक्यात शनिवारी 170 हून अधिक कोरोना बाधित आढळले असले तरी रविवारी मात्र हा आकडा त्याहून अधिक जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तर मृत होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याने एकच भीती निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन अथणी तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.