सर्वसामान्य नागरिकांसहित काल जिल्हा पालकमंत्र्यांनीही बीम्सच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले आणि होत असलेल्या गैरसोयी त्वरित सुधारण्याच्या सूचना केल्या. परंतु बीम्स मध्ये नवनवीन प्रकरणे दिवसागणिक वाढत असून बीम्स प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बिम्स येथे उपचारासाठी आणलेल्या उज्वल नगर येथील एका 50 वर्षीय रूग्णाचा रुग्णालयाबाहेरच मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली आहे. या रुग्णावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. दरम्यान संबंधित रुग्णाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याने बिम्स रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्यांच्या गलथान कारभाराविरूद्ध रूग्णाच्या कुटुंबियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या रुग्णाची कोरोना चाचणीही करण्यात आली असून चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु तरीही बीम्सच्यावतीने केएलई रुग्णालयात या रुग्णाला पाठविण्यात आले. कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याने केएलई रुग्णालयाने पुन्हा या रुग्णाला बीम्समध्ये पाठविण्यात आले. आणि या सर्व प्रकारच्या दुर्लक्षामुळे या रुग्णाला आपला प्राण गमवावा लागला आहे.
यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांना घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली. जवळपास ४ तास नाहक या रुग्णालयातून त्या रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागल्या असून यावेळेत जर आपल्या माणसाला योग्य वेळेत योग्य उपचार मिळाले असते तर कदाचित आपल्या माणसाचा जीव वाचला असता. आपल्याला मिळालेल्या या अमानुष वागणुकीबद्दल मृताच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करून भविष्यात अशी वेळ कोणावरही येऊ नये असे मत व्यक्त केले.
कोरोनाची दहशत प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरत असून जीवदान देणाऱ्या डॉक्टर्सकडूनच अशाप्रकारे वागणूक दिली जात असेल तर सर्वसामान्यांनी कोणाचा आशेवर राहावे, हा प्रश्न उपस्थित होतो.