कोरोना महामारीमुळे अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत देखील सर्वसामान्यांना महत्त्वाचे वाटणारे आणि मोठ्या प्रमाणात उलाढाल होणाऱ्या एपीएमसी मधील भाजी मार्केटचा निर्णय आज होणार आहे. याबाबत अध्यक्ष आनंद पाटील यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहल्ली यांच्याशी संपर्क साधून निर्णय घेण्याचा विचार सुरू केला आहे.
मागील आठवडाभरापासून एपीएमसीमध्ये भाजी मार्केट सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र सुरक्षित अंतरचा अभाव आणि कोरोनाच्या वाढत्या महामारीमूळे हा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चालढकल केली होती. मात्र याबाबत आता लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष आनंद पाटील यांनी सांगितले आहे.
मागील दोन महिन्यापासून उपनगरातील तीन ठिकाणी भाजी मार्केट सुरू करण्यात आले होते. मात्र पावसामुळे तेथे भाजी खरेदी विक्री करणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आम्हाला एपीएमसी येथे भाजी मार्केट सुरू करून द्यावे अशी मागणी केली आहे.
याबाबत अध्यक्ष आनंद पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यावर निर्णय घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे अनेकांना सोयीचे ठरावे असा पर्यायी मार्ग काढून एपीएमसी येथे भाजी मार्केट सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.