बेळगावात आज सोमवारी खऱ्या अर्थाने मान्सूनचे आगमन झाले आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.
मृगनक्षत्र ला प्रारंभ झाला आहे. गेल्या शुक्रवारी मान्सूनच्या पहिल्या पावसाचे शहरात आगमन झाले तरी त्या पावसाला म्हणावा तसा जोर नव्हता. त्यानंतर बेळगाव शहरात आज सोमवार सकाळपासून खऱ्या अर्थाने मान्सूनच्या पावसाला प्रारंभ झाला. सोमवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. संततधार पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. उसंत न घेता पडणाऱ्या पावसामुळे शहरातील ठिकाणची गटारे तुंबून केरकचरासह पाणी रस्त्यावर आले आहे. या पावसामुळे शहर आणि उपनगरातील विविध भागात पाणी साचले आहे.
पाऊस आल्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रेनकोट व छत्री यांचा आधार घ्यावा लागला. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील फेरीवाले व भाजी विक्रेत्यांना प्लास्टिक तसेच छत्रीचा आसरा घ्यावा लागला. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून विशेष करून बाजार पेठेतील रविवार पेठ व इतर भागात चिखलाची दलदल निर्माण झाली आहे. सध्या शहरात बहुतांश ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत.
या ठिकाणी तर चिखलाचे जणू साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे बर्याच ठिकाणचा रस्त्यावर नागरिकांना पायी ये-जा करणे देखील कठीण झाले आहे. वाहनचालकांना तर चिखलातून वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. स्मार्ट सिटीच्या अर्धवट अवस्थेतील कामामुळे शहरातील बहुतांश रस्ते पावसाच्या जोरदार हजेरीमुळे चिखलमय झाले आहेत. बऱ्याच रस्त्यांची दुरुस्ती झालेली नसल्यामुळे संबंधित रस्त्यावरील खड्ड्यांचे गढूळ पाण्याच्या डबक्यात रूपांतर झाल्याचे पहावयास मिळत आहे.
सकाळपासून संततधार सुरू झालेला हा पाऊस दिवसभर असाच पडत राहिल्यास दरवर्षी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्या शहरातील नानावाडी, मराठा कॉलनी, शांती कॉलनी, मन्यार लेआउट, एमजी कॉलनी, समर्थनगर, शिवाजीनगर, शास्त्रीनगर, वीरभद्रनगर, गूडशेड रोड आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे.