श्रीनगर येथील एका महिलेला “सारी”ची (सिव्हीयर अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन) बाधा झाल्याचे शुक्रवारी उघडकीस आल्यानंतर संबंधित परिसर सील डाऊन करण्यात आला आहे.
सारीची बाधा झालेली पी -10626 क्रमांकाची 30 वर्षीय महिला वंटमुरी कॉलनी, श्रीनगर येथील असल्याने सदर वसाहत सील डाऊन करण्यात आली असून या ठिकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या भागातील सर्व दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद करण्यात आली आहेत. सदर महिलेमध्ये कोरोना सारख्या श्वसन संसर्गासह उच्च तापाची लक्षणे आढळून आली आहेत.
या पद्धतीची लक्षणे आढळून आलेली शहरातील ही पहिली “सारी” रुग्ण आहे. कांही दिवसापूर्वी एका 8 वर्षीय मुलाला कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आल्याने वडगांव आणि फुले गल्ली, येळ्ळूर क्रॉस हा भाग देखील सध्या सील डाऊन करण्यात आला आहे. येथील महाराष्ट्रातून आलेल्या एका कुटुंबाला होम काॅरन्टाईन करण्यात आले होते. परंतु कांही दिवसांपूर्वी या कुटुंबातील आठ वर्षीय मुलगा कोरोनाग्रस्त आढळून आला होता. दरम्यान या भागाची कंटेनमेंट घेऊन म्हणून अधिकृत घोषणा झालेली नाही.
सिव्हीयर अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शनची (सारी) लक्षणे कोरोना संसर्ग प्रमाणेच असतात. त्यामुळे या रोगाचा कोरोनामध्ये समावेश करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या मते कर्नाटकातील बहुतांश “सारी” रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांचे सेकंडरी कॉन्टॅक्ट आहेत. सारी रुग्णांमध्ये न्युमोनियाप्रमाणे लक्षणे आढळतात. परिणामी त्यांच्यापासून संसर्गाचा धोका असल्याने त्यांच्यावर कोरोना रुग्णाप्रमाणे उपचार करावे लागतात. या पद्धतीचे रूग्ण तपासणीत कोरोनाबाधित आढळून आले तरच त्यांना कोव्हीड -19 वार्डमध्ये हलविण्यात येते.