यंदा संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. कोरोनाचे हे संकट लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय टिळकवाडी परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते घेतला आहे.
टिळकवाडी येथील समर्थ मंदिर सभागृहांमध्ये मंगळवारी झालेल्या टिळकवाडी परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपरोक्त निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. टिळकवाडी भागातील सुमारे 15 हून अधिक मंडळांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपक्रम राबवित आहे यासाठी सर्व उत्सव सणवार साधेपणाने व नियमांचे पालन करून साजरे करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत याची दखल घेऊन टिळकवाडी येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदाचा गणेशोत्सव जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला यावेळी काही मंडळांनी आपण भव्य मूर्तीला फाटा देऊन पाच फुटाच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणार असल्याचे स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे मंडपावर करण्यात येणारी रोषणाई वर्गणी गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
सदर बैठकीस युवा नेते व्यंकटेश सरनोबत, माजी नगरसेवक अनंत देशपांडे, उदय बी. एम., सचिन चव्हाण, राजू आजगांवकर, राजू नाईक, उमेश नाईक, श्रीराम शिंदे, उदय सावंत, विनायक दरवंदर, पवन कांबळे, अशोक जोशिलकर, अप्पू पाटील आदीसह टिळकवाडी भागातील गणेश चौक पहिले रेल्वे गेट, खानापूर रोड, हिंदूनगर, सिद्धिविनायक मंदिर एम. जी. रोड, राणा प्रताप रोड, चौगुलेवाडी, सोमवार पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी कॉलनी आणि पापा मळा या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.