मुसळधार पावसामुळे शहरातील इंडाल आणि ऑटो नगर मधील तात्पुरत्या भाजी मार्केटची पार दुर्दशा होत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे शुक्रवार दि. 5 जून पासून सदर मार्केट बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
अलीकडेच अवकाळी वादळी पावसामुळे बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील तात्पुरते भाजी मार्केट भुईसपाट झाले होते. त्यावेळी येथील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याबरोबरच वादळी वाऱ्यामुळे उडालेले पत्रे लागून दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी आपल्याला अन्यत्र सुरक्षित ठिकाणी भाजी मार्केटची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानंतर आता पुन्हा गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे सदर भाजी मार्केट पार दुर्दशा झाली आहे.
मार्केटमध्ये सर्वत्र चिखलाच्या दलदलीचे साम्राज्य निर्माण होऊन पाण्याची तळी साचली आहेत. त्याचप्रमाणे मागील वेळेप्रमाणे भाजीपाला याचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार विनंती करून देखील नुकसानभरपाई दिली जात नाही आणि भाजी मार्केटची अन्यत्र व्यवस्थाही केली जात नाही. यासाठी येथील भाजी व्यापाऱ्यांनी 5 जूनपासून मार्केट बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खालील आशयाचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे.
कोरोनाच्या साथीमुळे आम्हा व्यापारी बांधवांना सरकारने तात्पुरती मार्केटमध्ये भाजी विक्री व्यवस्था केली आहे. परंतु पावसाळ्यात येथे चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे नुकसान होते आहे. तसेच जे खरेदीदार भाजी खरेदी करतात त्यांचा भाजीपाला सुध्दा पावसामुळे पूर्ण खराब होऊन, आम्हा व्यापारीवर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
आम्ही कित्येक वेळा प्रशासनाला विनंती करून सुद्धा अधिकारीवर्ग आमची दाद घेत नाही. त्यामुळे येत्या शुक्रवार दि.5 जूनपासुन आम्हाला नाईलाजस्तव मार्केट बेमुदत बंद करावे लागत आहे. तरी सर्व व्यापारी व शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे.