भारतीय लष्करात सेवेत असताना रजेवर घरी आल्यानंतर चोरी आणि लोकांची फसवणूक करण्याचा धंदा करणाऱ्या मूळच्या बेळगावच्या खानापूर तालुक्यातील असलेल्या एका बडतर्फ कर्मचाऱ्याला महाराष्ट्रातील नगर एमआयडीसी परिसरात स्थानिक गुन्हे शाखा आणि मिलिटरी इंटेलिजन्स पथकाने अटक केली. तसेच त्याच्या जवळील 7 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नगर स्थानिक गुन्हे शाखा आणि मिलिटरी इंटेलिजन्स पथकाने ताब्यात घेतलेल्या बडतर्फ लष्करी कर्मचाऱ्याचे नांव प्रशांत भाऊराव पाटील (वय 32, रवळनाथ रोड, कुप्पटगिरी, ता. खानापूर, जि. बेळगाव) असे आहे. भारतीय सैन्य दलात असलेला प्रशांत पाटील रजा काढून घरी आला की चोऱ्या करणे आणि लोकांची फसवणूक करण्याचा धंदा करत होता अहमदनगर शहरासह महाराष्ट्र राज्यभरात याचा हा धंदा सुरू होता. पोलिसांनी सापळा लावून अटक केल्यानंतर झडतीमध्ये प्रशांत त्याच्याकडून सैन्यदलाच्या बनावट ओळखपत्रासह अन्य बनावट कागदपत्रे, पत्नीच्या नावे डीपेंडिंग कार्ड, पाच वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आर्मीच्या नोकरीसाठी वेगवेगळ्या लोकांकडून भरून घेतलेले अर्ज, पत्नीच्या नांवे 14 पासबुके, वेगवेगळ्या बँकेची 75 बुके, एक चारचाकी वाहन, बनावट नंबर प्लेट, 5 मोबाईल्स आदींसह 7 लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, आसाम रायफल्सचा कर्मचारी असणारा प्रशांत पाटील 2014 साली रजेवर आल्यानंतर पुन्हा कामावर हजर झाला नव्हता त्यामुळे त्याला नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर लष्करी गणवेश व अन्य साहित्य यांच्या आधारे तो लोकांची फसवणूक करत होता, अशी माहिती उघडकीस आली आहे.