गोवावेसनजीकच्या कल्पनाशक्ती शोरूम ते गोगटे पेट्रोल पंप दरम्यानच्या बेळगाव – खानापूर मार्गावर सुरु असलेला उलट्या दिशेने वाहने चालविण्याचा धोकादायक प्रकार रहदारी पोलिसांनी त्वरित थांबवावा, अशी मागणी केली जात आहे.
बेळगाव रेल्वे स्थानकानजीकच्या गोगटे सर्कलपासून ते टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट पर्यंतच्या बेळगाव – खानापूर मार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. या मार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते.
तथापि अलीकडे बऱ्याच दिवसांपासून गोवावेस नजीकच्या कल्पनाशक्ती शोरूम ते गोगटे पेट्रोल पंपापर्यंतच्या या मार्गावर वाहन चालक उलट्या दिशेने वाहने चालवत असल्याचा प्रकार वाढला आहे. यामुळे कल्पनाशक्ती शोरूम व येथील दत्त मंदिरासमोर उलट्या दिशेने येणारी वाहने आणि तिसऱ्या रेल्वे गेटच्या दिशेने निघालेली वाहने यांच्या टकरी होऊन अपघात घडत आहेत.अनेक पादचारी लोकांचे लहान लहान अपघात होत आहेत. आर पी डी क्रॉस ते अनगोळ नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील हीच परिस्थिती आहे.
मोठ्या प्रमाणात अवजडसह सर्व प्रकारच्या वाहनांची बेळगाव – खानापूर महामार्गावर मोठी वर्दळ असते. त्यामुळे संबंधित ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. तेंव्हा रहदारी पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कल्पनाशक्ती ते गोगटे पेट्रोल पंपच्या दरम्यान तात्काळ “नो एंट्री”चा बोर्ड लावून या रस्त्यावर उलट्या दिशेने वाहने चालवण्यास मज्जाव करावा. त्याप्रमाणे या पद्धतीने वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.