Friday, January 3, 2025

/

सार्वजनिक वाचनालयातर्फे महाराष्ट्र शासनास 51 हजाराचा निधी’

 belgaum

बेळगाव कोरोना विरोधात महाराष्ट्र सरकारने ज्या विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सार्वजनिक वाचनालयातर्फे 51 हजार रुपयांचा निधी देण्यात आला. चंदगडचे आमदार श्री राजेश पाटील यांच्याकडे या निधीचा धनादेश वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत यांनी सुपूर्द केला .

यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे कार्यवाह नेताजी जाधव, सहकार्यवाह ऍड. ईश्वर मुचंडी व सदस्य अनंत लाड उपस्थित होते.सार्वजनिक वाचनालयातर्फे दरवर्षी बेळगाव शहर व तालुक्यातील मराठी माध्यमाच्या शाळेतून दहावी परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रकमेसह प्रशस्तीपत्र देऊन गौरविले जाते .हा कार्यक्रम दरवर्षी शाहू जयंतीच्या निमित्ताने केला जातो. पण यंदा अद्याप दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत त्यामुळे तो कार्यक्रम रद्द करून दरवर्षीप्रमाणे राजर्षी शाहू महाराज जयंती शुक्रवारी साजरी करण्यात आली.

शाहू महाराजांच्या प्रतिमेला आमदार राजेश पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला शाहू महाराजांच्या कार्याचे कौतुक केले त्यांच्यामुळेच बहुजन समाज सुशिक्षित होऊ शकला आणि अनेक माणसे घडली असे ते म्हणाले. तर नेताजी जाधव यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले .

आमदार राजेश पाटील यांचा सन्मान राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या अनंत लाड यांनी शाहू महाराजांच्या जीवनाचा आढावा घेतला .’महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहू महाराजांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल, शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी जे कार्य केले त्याला तोड नाही.

Vachanalaya bgm
Vachanalaya bgm

शाहू महाराजांनी वयाच्या विसाव्या वर्षी सत्ता हातात घेतली आणि त्यानंतरच्या 28 वर्षात प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षणाबरोबरच तांत्रिक शिक्षणासाठी द्वारे खुली केली. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नाट्यगृहांची निर्मिती केली, मल्लांसाठी आखाडे निर्माण केले. बाहेरगावाहून कोल्हापुरात शिक्षणासाठी येणाऱ्या विविध जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी तीस वसतिगृहांची निर्मिती केली. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राधानगरी धरण बांधले. अस्पृश्यता दूर करण्यासाठी आंतरजातीय विवाह व विधवांसाठी पुनर्विवाहाचा कायदा केला. शाहू महाराज म्हणजे द्रष्टे, मुत्सद्दी व अचाट बुद्धिमत्ता लाभलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व’ अशा शब्दात अनंत लाड यांनी त्यांचा गौरव केला. असा हा सामाजिक क्रांतीचा जनक 6 मे 1922 रोजी काळाच्या पडद्याआड गेला त्यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे.

केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर ते जगाला दिशा दर्शवणारे आहे असे ते म्हणाले कार्यक्रमाचा समारोप ईश्वर मुचंडी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते आमदार राजेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.