मागील वर्षी अतिवृष्टीच्या काळात सांबरा एअर फोर्स ट्रेनिंग सेंटरमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांबरा गावातील घरांसह शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. यासाठी यंदा एअर फोर्स स्टेशनचे पावसाचे पाणी पाणलोट क्षेत्रात सोडण्यास सांबरा ग्रामपंचायतीसह समस्त गावकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
सांबरा ग्रामपंचायत हद्दीतील पाणलोट क्षेत्रात सांबरा एअरफोर्स स्टेशनकडून सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त पाण्यासह पावसाच्या पाण्यासंदर्भात बुधवारी सांबरा ग्रामपंचायत पदाधिकारी एअरफॉर्स स्टेशनचे अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत वरीलप्रमाणे विरोध दर्शविण्यात आला. पावसाळ्यात सांबरा एअरफॉर्स स्टेशनच्या नॉर्थ कॅम्पमधील वापरलेले अतिरिक्त पाणी आणि पावसाचे नैसर्गिक पाणी आराखड्यानुसार सांबरा ग्रामपंचायतीच्या पाणलोट क्षेत्रात सोडले जात होते. सांबरा गावातील तसेच आसपासच्या परिसरातील पावसाचे पाणीदेखील या ठिकाणी जमा होते. तथापि मागील वर्षी अतिवृष्टीप्रसंगी सांबरा एयर फोर्स स्टेशनमधून मोठ्या प्रमाणात आलेल्या पाण्यामुळे सांबरा गावासह परिसरातील शेत जमिनीमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे कांही घरांचे नुकसान होण्याबरोबरच भात, ऊस आदी शेत पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
यासंदर्भात बुधवारी झालेल्या बैठकीत यंदा सांबरा एअरफोर्स स्टेशन परिसरातील पावसाचे पाणी पाणलोट क्षेत्रात सोडण्यास तीव्र विरोध करण्यात आला. सदर बैठकीमध्ये चर्चेअंती सांबरा एअरफॉर्स स्टेशनमधील सर्वसामान्य वापराच्या पाण्यासह पावसाचे पाणी सांबरा ग्रामपंचायत हद्दीतील पाणलोट क्षेत्रात सोडण्याऐवजी ते बळळारी नाल्यांमध्ये सोडण्यात यावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. सांबरा एअरफॉर्स स्टेशनचे पाणी बळळारी नाल्यांमध्ये सोडण्यासाठी सुमारे दीड -एक किलोमीटर अंतराची ड्रेनेज पाईपलाईन घालावी लागणार आहे. तेंव्हा बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाबाबत आणि बळ्ळारी नाल्यापर्यंत ड्रेनेज पाईपलाईन घालण्याबाबत सांबरा ग्रामपंचायत पदाधिकारी आणि एअर फोर्स स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
सदर बैठकीस सांबरा एअरफॉर्स स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह सांबरा ग्रा. पं. अध्यक्ष लक्ष्मण कोल्याळकर, माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई, ता.पं. सदस्य काशिनाथ धर्माजी, राजू देसाई, माजी अध्यक्ष शंकर जत्राटी आदींसह ग्रा. पं. सदस्य आणि सांबरा ग्रामस्थ उपस्थित होते.