कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद करून शहरात विविध ठिकाणी विभागून सुरू करण्यात आलेले एपीएमसी भाजी मार्केट आता पूर्ववत एपीएमसी आवारातच सुरू झाल्यामुळे व्यापाऱ्यांसह दलाल आणि शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने शिरकाव केल्यानंतर उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठ्या भाजी मार्केट पैकी एक असणाऱ्या बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये अर्थात एपीएमसीमध्ये वाढत्या गर्दीमुळे कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन होऊ लागले. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने एपीएमसी येथील मुख्य भाजी मार्केट बंद करून हे भाजी मार्केट शहरातील बी. एस. येडियुरप्पा मार्ग ऑटोनगर आणि इंडाल या ठिकाणी विभागून सुरू ठेवले.
महिन्याभरापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे बी. एस. येडियुरप्पा मार्ग येथील भाजी मार्केट भुईसपाट झाले होते. त्यामुळे इंडाल आणि ऑटोनगर येथील होलसेल भाजी मार्केट मधून भाजीचे व्यवहार होत होते. एपीएमसी येथील भाजी मार्केट विभागले गेल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
आता लॉक डाऊन शिथलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अन्य बाबींबरोबरच एपीएमसी येथील भाजी मार्केट पूर्ववत एपीएमसी आवारातच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विभागलेली सर्व भाजी मार्केट बंद करून मंगळवारपासून एपीएमसी येथे भाजी खरेदी-विक्रीचे उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे मुख्य भाजी मार्केट पूर्ववत सुरू करण्यात आले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी आणि दलाला मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.