येळ्ळूर (ता.बेळगाव) गावातील बंद पडलेले पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले जावेत, अन्यथा समस्त येळ्ळूरवासियांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह आंदोलन छेडले जाईल, असा इशारा बेळगाव जिल्हा पंचायत आरोग्य व शिक्षण स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी दिला आहे.
जिल्हा पंचायत सभागृहामध्ये आज सोमवारी बेळगाव तालुक्यातील विकास कामांची आढावा बैठक पार पडली. याप्रसंगी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी उपरोक्त इशारा दिला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे होते. रमेश गोरले यांच्या प्रयत्नामुळे येळ्ळूर गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी 2019-20 मध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 60 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील असणाऱ्या गोरल यांनी येळ्ळूरवासियांना विश्वासात घेऊन नियोजित पाणीपुरवठा योजनेसाठी गावाचे सहा विभाग करून व्यवस्थित नियोजन केले आहे. चार महिन्यापूर्वी या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला. योजनेसाठी आवश्यक असणारे पाईप्स व अन्य साहित्य आणण्यात आले. तथापि कांही राजकीय हस्तक्षेपामुळे येळ्ळूर पाणीपुरवठा योजनेचे काम अचानक बंद पडले. सध्या या गावात 15 दिवसातून एकदा पिण्याचे पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
याकडे आजच्या बैठकीत रमेश गोरल यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच राजकीय स्वार्थापोटी बंद पाडण्यात आलेले येळ्ळूर पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा नाईलाजाने येळ्ळूरवासियांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडावे लागेल असे गोरल यांनी बैठकीत स्पष्ट केले. यावेळी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही. यांनी सदल पाणीपुरवठा योजनेची पुन्हा एकदा पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. तथापि जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मात्र संबंधित योजना लवकरात लवकर पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिली जाईल अशी ग्वाही दिली. येळ्ळूर रोडवरील केएलई हॉस्पिटलला खेडकर जलाशयाच्या जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तेच पाणी येळ्ळूर गावालाही ही पुरविले जावे, अशी मागणीही यावेळी रमेश गोरल यांनी केली.
यावेळी लोक प्रतिनिधीने आपल्या मतदार संघात किती मोठी रक्कम खर्च करून कोणकोणत्या योजना राबविल्या जात आहेत याची माहिती देण्यास सुरुवात केली. त्यावेळी गोरल यांनी कांही स्पष्टीकरणांना आक्षेप घेऊन दक्षिण मतदार संघातील काही योजना फक्त कागदावरच असल्याचे सांगितले.
आरोग्य खात्याच्या विविध योजनांसाठी सरकारकडून मंजूर झालेला 1 कोटी 73 लाख रुपयांचा निधी कृती योजना तयार असतानादेखील फक्त अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे परत सरकार जमा झाल्याची माहिती आरोग्य स्थायी कमिटीचे अध्यक्ष यानात्याने रमेश गोरल यांनी बैठकीत दिली. तेंव्हा जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी संबंधित निधी आपण पुन्हा परत मिळवून देऊ असे आश्वासन गोरल यांना दिले.
बेळगाव तालुक्यातील के.के.कोप्प आणि देसुर येथील तलावाच्या कामाबाबतही रमेश गोरली यांनी बैठकीत आवाज उठविला. येथील तलावाचे काम संबंधित अधिकारी व इंजिनियर यांच्या गैरहजेरीमुळे व्यवस्थितपणे केले जात नाही आहे. याठिकाणी तलावातील गाळ दूर नेऊन टाकण्याची तलावाच्या काठावरच त्याचे ढिगारे ठेवले जात आहेत. परिणामी सध्याच्या पावसाळी वातावरणात हा गाळ पुन्हा तलावात जाऊन पडत आहे. त्यामुळे तलावाच्या कामाचा मूळ उद्देश बाजूला पडत चालला आहे. अधिकाऱ्यांकडून फक्त टार्गेट गाठण्यासाठी सुरू असलेल्या या कामामुळे सरकारचा पैसा मात्र वाया जात आहे, असे गोरले यांनी बैठकीत सांगितले.
देसूर येथील तलावाच्या कामासाठी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तथापि सर्व्हे अर्थात सर्वेक्षण न करताच अतिक्रमण झालेली जागा सोडून या तलावाचे काम केले जात आहे. शिवाय जे काम सुरू आहे ते देखील दर्जेदार नाही. मागील वेळेला या तलावासाठी मंजूर झालेले 40 लाख रुपये वाया गेले होते, तसाच प्रकार यावेळी घडण्याची शक्यता रमेश गोरल यांनी बैठकीत व्यक्त केली.सोमवारच्या आढावा बैठकीस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, आमदार ॲड. अनिल बेनके आदी उपस्थित होते.