गेल्या कांही दिवसांपासून पडणारा पाऊस आणि धुक्याचे वातावरण यामुळे राजहंस गडाचे (येळ्ळूर गड) मोहोरलेले सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांमुळे गडाला भेट म्हणजे अडथळ्याची शर्यत ठरत असल्याने पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यासाठी बऱ्याच जणांनी शहरापासून अवघ्या 7-8 कि. मी. वरील राजहंस गड पर्यटनाचा बेत रद्द केला आहे.
कोरोना आणि लॉक डाऊनच्या निर्बंधामुळे सध्या पर्यटकांना राजहंस गडाला भेट देणे कठीण झाले आहे. आयुब मकानदार हे गेल्या मंगळवारी आपल्या मित्रांसोबत राजहंस गडावर निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी गेले होते. परंतु गडावर पोहोचल्यानंतर मित्रांमध्ये पोलिसांनी गडावर येण्यास घातलेल्या निर्बंधाबाबत चर्चा झाली. गडावर जाण्यास बंदी घातली असल्यामुळे पोलीस कोणत्याही क्षणी येथे आल्यास आपण अडचणीत येऊ शकतो, हे लक्षात येताच मकानदार आणि त्यांच्या मित्रांना गडावरून आल्या पावली माघारी फिरावे लागले. पोलिसांच्या भीतीमुळे त्यांना सहलीचा आनंदच लुटता आला नाही.
मी आणि माझे काही मित्र आम्ही दररोज सकाळी सायकलींग करत येळ्ळूर गडावर जात होतो. परंतु सध्या पोलिसांनी गडावर जाण्यास बंदी घातल्यामुळे आम्ही गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊन माघारी फिरत आहोत, असे अजय डोंगरे या सायकलपटूने सांगितले.
येळ्ळूर येथील रहिवासी गणेश अष्टेकर म्हणाले की, परंपरेनुसार दरवर्षी या कालावधीत वरूण देवाला (पावसाला) प्रसन्न करण्यासाठी येळ्ळूर आणि शहापूर येथील नागरिक राजहंस गडावर खास पूजेचे आयोजन करून महाप्रसादाचे वाटप करत असतात परंतु लॉक डाऊनमुळे यंदा प्रथमच हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.