गेल्या तीन दिवसापासून हजेरी लावणाऱ्या मान्सून पूर्व पावसामुळे शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पावसासह हवेतील गारठ्यामुळे गरम कपडे आणि अडगळीत असलेल्या रेनकोट, छत्र्या बाहेर पडल्या आहेत.
अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या वादळी पावसाने गेल्या तीन दिवसापासून शहरात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने इतका जोराचा दणका दिला की शहरातील गटारी, ड्रेनेज व नाले तुडुंब भरून वाहू लागले.
सखल भागातील दुकाने आणि घराघरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. घरात व दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे बऱ्याच जणांचे नुकसानही झाले.
पाऊस ओसरताच महापालिकेकडून तुंबलेले नाले व गटार सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांनी घराचे छत दुरुस्ती व इतर कामे हाती घेतली आहेत. प्रारंभी दोन दिवस पावसाने मुसळधार हा हजेरी लावल्यामुळे अद्यापही बऱ्याच ठिकाणच्या सखल भागात तसेच ठीकठिकाणांच्या मैदानांवर पाण्याची तळी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या पाऊस ओसरला असला तरी ढगाळ वातावरण कायम आहे. मान्सून पूर्व पावसाळी वातावरणामुळे अडगळीत टाकलेल्या रेनकोट व छत्र्या नागरिकांना बाहेर काढावे लागले आहेत. सलग तीन दिवस सूर्यदर्शन दुर्मिळ झाले असून हवेत गारठा निर्माण झाला आहे. परिणामी नागरिकांच्या अंगावर उबदार कपडे दिसू लागले आहेत.