आपल्याला जगायचे असेल तर “झाडे वाचवा झाडे जगवा” असा संदेश देत व्हॅक्सिन डेपो येथील मोठमोठी झाडे वाचली पाहिजे. विकास करा परंतु झाडे न तोडता हा विकास कसा साधता येईल याचा विचार करा, असे कळकळीचे आवाहन बेळगावातील सुप्रसिद्ध चित्रकार महेश होनुले यांनी “बेळगाव लाईव्ह”शी बोलताना केले.
आम्ही तर तुम्हाला सहृदय समजत होतो. मात्र तुम्ही तर आमची इतक्या सहजतेने कत्तल करता. आम्हाला तुमची कीव येते. लक्षात ठेवा आम्हाला जिवंत ठेवलात तरच तुम्ही जिवंत राहू शकता, होय हे खरे आहे. आम्ही वृक्ष आहोत बोलत नाही पण आम्हाला भावना आहेत. वृक्षांच्या याच भावना गुलमोहर बाग या आर्टिस्ट ग्रुपचे सदस्य चित्रकार महेश होनुले यांनी आपल्या कुंचल्यातून कॅनव्हासवर व्यक्त केल्या असून यासंदर्भात ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते.
लॉक डाऊनच्या काळाचा सदुपयोग करताना महेश होनुले या चित्रकाराने अनेक चित्रे तर रंगवलीच, शिवाय अलीकडे व्हॅक्सिन डेपो येथे सुरू असलेली वृक्षांची कत्तल पाहून “मर्डर ऑफ द ट्री” ही मध्यवर्ती संकल्पना समोर ठेवून आपली संवेदना महेश यांनी कॅनव्हासवर उमटविली आहे. जलरंगातील या चित्रांमध्ये झाडे तोडली जातात याची वेदना व अस्वस्थता दिसून येते.
गेली 15 वर्षे चित्रकलेत रमणाऱ्या महेश होनुले यांनी बेळगावातली फाइन आर्टचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी आपली सर्व चित्रे खास करून जलरंगात रेखाटली आहेत. व्हॅक्सिन डेपोतील झाडे न तोडता विकास साधता आला पाहिजे. लँडस्केप बनवण्यासाठी माझ्यासह अनेक चित्रकार व्हॅक्सिन डेपोत जातात. व्हॅक्सिन डेपोसह कॅम्प परिसर आणि किल्ल्यामध्ये अनेक चित्रकार घडले आहेत. कारण तेथे घनदाट झाडे असून त्यांना तोडले जाऊ नये, असे होनुले म्हणाले. व्हॅक्सिन डेपोमधील विविध ठिकाणची चित्रे काढून त्यांचे प्रदर्शन भरवण्याचा महेश होनुले यांचा विचार होता. त्यांनी 10 चित्रे काढली देखील होती, परंतु दुर्दैवाने लॉक डाऊनमुळे त्यांना आपला विचार अर्ध्यावर सोडून द्यावा लागला. आपल्या स्टुडिओ आणि आर्ट गॅलरीमध्ये बेळगाव लाइव्हशी बोलताना त्यांनी आतापर्यंत काढलेली विविध चित्रे दाखवून त्यांची माहिती दिली.