कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहावीच्या परीक्षेला अखेर प्रारंभ झाला असून आज पहिल्याच दिवशी बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात तब्बल 2,446 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले आहेत. यावरून सर्वसामान्यांमध्ये कोरोनाची भीती अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे.
राज्यातील यंदाच्या बहुचर्चित दहावीच्या परीक्षेला आज गुरुवार दि 25 जूनपासून प्रारंभ झाला असून येत्या 2 जुलैपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. या परीक्षेसाठी बेळगाव जिल्ह्यात 32,356 विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला होता. त्यापैकी 788 विद्यार्थी आज पहिल्याच दिवशी गैरहजर राहिले. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 40,436 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, त्यापैकी 1658 विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत. या पद्धतीने या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यात मिळून एकूण 2,446 विद्यार्थी पहिल्या दिवशी परीक्षेस गैरहजर होते.
गैरहजर विद्यार्थ्यांची ही आकडेवारी लक्षात घेता हा कोरोनाच्या दहशतीचा प्रताप असल्याचे जाणकारांचे मत आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात दहावीची परीक्षा घेण्यास पालक वर्गासह राज्यातील विरोधी पक्षापर्यंत सर्वांचाच विरोध होता. तथापि हा विरोध डावलून राज्य शासनाने आपल्या निर्णयावर ठाम राहात आज गुरुवार दि 25 जूनपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ केला आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सार्वजनिक शिक्षण खात्याने जिल्हा प्रशासनासह आरोग्य आणि पोलिस खात्याच्या मदतीने या परीक्षेचे योग्य नियोजन केले आहे. तथापि आज पहिल्या दिवशी परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता कोरोनाच्या भीतीमुळेच बहुदा पालकांनी आपल्या मुलांना परीक्षेत धाडले नसावे असा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे.