कोरोनाविषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी शुक्रवारी शहरातील व्यावसायिक, व्यापारी व दुकानदारांची तातडीची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना दिल्या.
राज्याप्रमाणे बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन याबाबत पुन्हा गांभीर्याने विचार करत आहे. लॉक डाऊन शिथलीकरणानंतर कोरोनासंदर्भातील नियम पालनाच्या बाबतीत देखील शिथीलता दिसून येत आहे. यासाठी पोलिस महानिरीक्षकांनी शुक्रवारी शहरातील व्यावसायिक, व्यापारी व दुकानदारांची तातडीची बैठक बोलावली होती.
व्यावसायिक, व्यापारी व दुकानदारांनी आपल्या उत्पादनांचे दुकानाबाहेर प्रदर्शन मांडू नये, प्रत्येक ग्राहकांची सर्व माहिती नोंद करून घ्यावी, त्यांचे मोबाईल किंवा फोन नंबर नोंद करून घ्यावेत, हॅन्ड सॅनिटायझरचा उपयोग करण्याबरोबरच मास्कचा सक्तीने वापर करावा, जर शक्य असेल तर थर्मामीटर अथवा थर्मल स्कॅनिंग मशीनचा वापर करावा, आपली दुकाने व आस्थापनांचे सातत्याने निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास यांनी बैठकीप्रसंगी दिल्या. सदर बैठकीस शहरातील बरेच व्यावसायिक, व्यापारी व दुकानदार उपस्थित होते.