कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्या गुरुवार दि. 25 जूनपासून राज्यभरात दहावीची (एसएसएलसी) परीक्षा सुरू होत आहे. बेळगाव शहरासह जिल्ह्यात ही परीक्षा सुरक्षित व सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण खाते आणि प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. तेंव्हा पालकांनी कोणतीही भीती न बाळगता निर्धास्तपणे आपल्या मुलांना परीक्षेस पाठवावे, असे आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केले आहे.
दहावीच्या परीक्षेला उद्या गुरुवार पासून प्रारंभ होणार असल्याने आज बुधवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आपल्या मतदारसंघातील दहावीच्या परीक्षा केंद्रांना भेट देऊन कोरोना संदर्भातील तेथील पूर्वतयारीची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त आवाहन केले. दहावीच्या परीक्षेसाठी शिक्षण खाते व जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी अत्यंत समाधानकारक असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की, परीक्षा केंद्राच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एक ते दीड तास आधी पोहोचायचे आहे. मुला -मुलींच्या वेगवेगळ्या रांगा करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करत त्यांना परीक्षा केंद्रात सोडले जाईल.
त्याठिकाणी प्रथम विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल. त्यानंतर सॅनिटायझेशन आणि आरोग्य तपासणी होईल. आरोग्य तपासणीत एखाद्या विद्यार्थ्यांमध्ये ताप वगैरे लक्षणे आढळल्यास त्याला परीक्षेसाठी वेगळ्या खोलीत स्वतंत्र बसविले जाईल. या सर्व प्रक्रियेदरम्यान स्काऊट अँड गाईड, पोलीस, त्याचबरोबर शिक्षण खात्यातील अधिकारी केंद्रामध्ये उपस्थित असतील. प्रत्येक परीक्षा केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली असून थर्मल स्कॅनिंग मशीन्स व मास्क पुरवण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार ॲड. बेनके यांनी दिली.
या पद्धतीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोखपणे आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, परीक्षा केंद्र आदी माहिती पालकवर्गांला मोबाईलवर देण्यात आली आहे. तेंव्हा पालकांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी येऊन विनाकारण गर्दी करू नये. त्यांनी मनात कोणतीही शंका न बाळगता पालकांनी आपल्या मुलांना निर्धास्तपणे एकटे परीक्षेस पाठवावे, असे आवाहन आमदार ॲड. बेनके यांनी केले. आमदारांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी त्यांच्यासमवेत शहर गटशिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी आमदार अॅड. अनिल बेनके यांनी आपल्या कोव्हीड -19 सेवा अभियानाअंतर्गत शहर गटशिक्षणाधिकारी यांकडे दहावीच्या परीक्षेसाठी 1,400 मास्क सुपूर्द केले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1139307476426844&id=375504746140458