शहरातील सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयामध्ये होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगचा पार बोजवारा उडाला असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.
लॉक डाऊनच्या शिथलीकरणानंतर शहरातील सब रजिस्ट्रार अर्थात उपनोंदणी कार्यालयामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. प्रारंभी या ठिकाणी कोरोना संदर्भातील सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे व्यवस्थित पालन केले जात होते. कार्यालयात गर्दी होऊ नये आणि नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये यासाठी याठिकाणी पोलिसाची नेमणूक देखील करण्यात आली होती. परंतु या पोलिसाने पहिले कांही दिवसच आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले आणि त्यानंतर मात्र तो गायब झाला.
शिस्त लावण्यास कोणीही नसल्यामुळे गेल्या कांही दिवसांपासून सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये नागरिकांची एकच गर्दी होत आहे. या कार्यालयामध्ये मंगळवारी देखील हाच प्रकार पहावयास मिळाला. सदर कार्यालयात सात कॉम्प्युटर असून त्यावर नोंदणी आदी कामे चालतात. या प्रत्येक ठिकाणी आज एकाच वेळी 5 – 6 लोकांची गर्दी झाल्याचे दिसून येत होते. सोशल डिस्टंसिंगचा नियम पायदळी तुडवत एकंदर जवळपास 50 – 60 लोक आपापली कामे घेऊन या कार्यालयात गर्दी करून थांबले होते.
मिळालेल्या माहितीनुसार कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून या कार्यालयातील उपनोंदणी अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यालयातील आपली जागा बदलून याच इमारतीतील दुसरीकडे एका खोलीत आपले कार्यालय थाटले आहे. सर्वांपासून अलिप्त असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होत आहे, मोठी गर्दी होत आहे याचा पत्ताच नसतो. सर्वांपासून अलिप्त असलेल्या आपल्या खोलीतून ते सब रजिस्ट्रार कार्यालयातील कामकाज हाताळत असल्यामुळे हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. तेंव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन केले जाईल यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी जागरुक नागरिकांकडून केली जात आहे.