फक्त 100 दिवसांची भरणार शाळा? : अंमलात येणार नवे मॉडेल?
कोरोना दहशतीच्या पार्श्वभूमीवर 220 कामाचे दिवस (वर्किंग डेज) आणि 1,320 अवर्स इन स्कूल स्टडीज अर्थात शाळेतील अभ्यासाच्या तासांऐवजी शाळा आणि गृहपाठ यांचे संयोजन असणारे अभ्यासाचे नवे मॉडेल लवकरच देशभरात अंमलात येणार आहे. ज्यानुसार शाळा फक्त 100 दिवसांसाठी भरविली जाईल.
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालय सध्या अशा शिक्षण पद्धतीच्या प्रस्तावावर विचार करत आहे की, ज्याद्वारे इन-स्कूल लर्निंग अर्थात शाळेतील शिक्षणाचे 100 दिवस व 600 तास कमी होतील आणि त्याच प्रमाणात म्हणजे 100 दिवस व 600 तासांचा गृहपाठ होऊ शकेल. या दरम्यान जे उर्वरित 120 तास किंवा 20 दिवस शिल्लक राहतील ते डॉक्टर आणि समुपदेशकांसाठी मुलांच्या भावनिक आरोग्याचे निरीक्षण करण्यासाठी उपलब्ध असतील.
आता नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर अल्पावधीत अंमलात आणल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या नव्या मॉडेलच्या अनुषंगाने देशातील सर्व शाळांनी ज्या भागातील मुलांकडे ऑनलाइन सुविधा आणि शिक्षणाची अद्ययावत साधने नाहीत अशा मुलांना संबंधित सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्थलांतरित कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, ही मुले शैक्षणिक प्रवाहात राहावीत, यासाठी त्यांना त्या-त्या भागातील शाळांमध्ये तात्काळ प्रवेश दिला जावा. यासाठी ओळखपत्र, ट्रान्सफर सर्टिफिकेट अथवा इतर सर्वसामान्य आवश्यक गोष्टींसाठी त्यांना भेटीस धरले जाऊ नये, असे संबंधित मंत्रालयाकडून कळविण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे स्थलांतरित कामगार आपल्या कुटुंबासह मूळगांवी निघून गेले असतील आणि शाळा सुरू होण्यापूर्वी ते परत येणार नसतील तर संबंधित शाळांनी त्या कामगारांच्या मुलांची नांवे शाळेतून तात्काळ कमी करावीत. त्याचप्रमाणे एकावेळी एकूण पटसंख्येच्या 30 ते 50 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावावी. इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांनी आठवड्यातून 2 दिवस शाळेत यावे, तसेच सहावी ते आठवीच्या मुलांनी आठवड्यातून 2 ते 4 दिवस शाळेत हजेरी लावावी. याखेरीज इयत्ता नववी ते बारावीच्या मुलांनी आठवड्यातून 4 ते 5 दिवस शैक्षणिक हजेरी लावावी. शाळेतील शैक्षणिक वेळा पत्रातील 46 मिनिटांचे तास अर्थात वर्ग कमी करून ते प्रत्येकी 30 मिनिटाचे केले जावेत, काही ठराविक विषयांसाठी मात्र तासभराचे वर्ग घेतले जावेत आदी बाबींचा शालेय शिक्षणाच्या नव्या मॉडेलमध्ये अंतर्भाव आहे.