स्वॅब तपासणीचे अहवाल हाती येण्याआधीच इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन रुग्णांना घरी जाण्यास मोकळीक देण्याचा प्रकार उघडकीस आला असून यापैकी कांही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे मुतगा (ता. बेळगाव) येथे भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेली अशी की, पुणे, अहमदाबाद, बेंगलोर व हिरेबागेवाडी येथे जाऊन आलेल्या मुतगा येथील दोन पुरुष व दोन युवती अशा एकूण 4 जणांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आले होते. गावातील प्राथमिक शाळेमध्ये काॅरन्टाईन करण्यात आलेल्या या चौघा जणांचे 14 दिवसांचे इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन पूर्ण होण्याआधी स्वॅबचे नमुने घेण्याऐवजी 15 व्या दिवशी ते नमुने घेण्यात आले. त्यानंतर आणखी तीन दिवस त्यांना काॅरन्टाईन केंद्र ठेवून घेतल्यानंतर स्वॅब नमुन्यांचा अहवाल हाती येण्यापूर्वीच घरी जाऊ देण्यात आले.
आता संबंधित चौघा जणांच्या स्वॅबचा अर्थात कोरोना तपासणीचा अहवाल हाती आला असून त्यांच्यापैकी दोन्ही युवतींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यानच्या काळात या दोघीजणी अनेकांच्या संपर्कात आल्या आहेत. यापैकी एक युवती तर पुन्हा दोन वेळा हिरेबागेवाडी येथे जाऊन आली आहे. भाडोत्री घरात राहणाऱ्या या युवतीने घराखाली असलेल्या किराणा मालाच्या दुकानात आतापर्यंत किमान तीन वेळा तरी ये – जा केली आहे.
मुतगा हे गांव घनदाट लोकवस्तीचे असल्यामुळे अनेक जण या युवतींच्या संपर्कात आले असण्याची शक्यता आहे. संबंधित युवतींना पुन्हा इन्स्टिट्यूश्नल काॅरन्टाईन करण्यात आले असले तरी त्यांच्याकडून संसर्गाच्या शक्यतेमुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, सांबरा व बाळेकुंद्री या गावातही वरील प्रमाणे प्रकार घडला असल्याचे समजते. यासाठी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखावयाचा असेल तर बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात कडक लॉक डाऊन जारी करणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले जात आहे.