कोरोना प्रादुर्भाव व लॉक डाऊनमुळे सध्या निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षाची शालेय फी माफ करावी, अशी मागणी मराठी विद्यार्थी संघटना बेळगावतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे.
मराठी विद्यार्थी संघटना बेळगावचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि सरचिटणीस सिद्धार्थ चौगुले यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्येकाच्या जीवनावर वेगवेगळे परिणाम झाले आहेत.
कोरोनामुळे विद्यार्थी जीवन देखील स्तब्ध झाले आहे. सध्याच्या अस्थिर परिस्थितीत शैक्षणिक संस्थांनी शालेय फी आणि इतर शुल्कासाठी पालकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. लॉक डाऊनमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या असहाय्य पालकांसाठी शैक्षणिक संस्थांची मागणी पूर्ण करणे अशक्य आहे.
तेंव्हा प्रशासनाने ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्याबरोबरच यंदाची शालेय व अन्य शुल्क माफ करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी मराठी विद्यार्थी संघटनेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.