मागाच्यावर्षी पावसाळ्यात नाल्यातून पाणी व्यवस्थित वाहून गेले नसल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरून हाहाकार निर्माण झाला होता.जनते बरोबरच शेतकऱ्यांना देखील शेतीत पाणी पसरल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले होते.ही बाब गंभीरपणे घेऊन पालकमंत्री रमेश जारकीहोळी आज बळारी नाल्याची पाहणी केली.
बेळळारी नाला, कोनवाळ गल्ली नाला परिसराची पहाणी मंत्र्यांनी केली.बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी कोनवाळ गल्लीतील नाल्यांची माहिती पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना दिली.
यावेळी शेतकऱ्यांनी नाल्याचे पाणी सगळीकडे शिरून नुकसान कसे होते याची माहिती जारकीहोळी यांना दिली.शहरातील बळारी नाला,लेंडी नाला आणि नागझरी नाल्यात साठलेला कचरा त्वरित काढून त्याची विल्हेव्हाट लावा.नाल्यावर केलेली अतिक्रमणे त्वरित हटवा अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
नाल्याचे पाणी नागरी वस्तीत शिरू नये यासाठी उपाययोजना करा.अतिक्रमणे हटवून नाल्याच्या दुतर्फा काँक्रीटच्या संरक्षक भिंतिचे काम पूर्ण करा.जनतेला आणि शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये आणि नुकसान होऊ नये यादृष्टीने उपयाययोजना करा असा आदेश रमेश जारकीहोळी यांनी मनपा आयुक्तांना बजावला.
यावेळी जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.