राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजप हायकमांडने ईराण्णा कडाडी यांना उमेदवारी दिली आहे. प्रभाकर कोरे व रमेश कत्ती त्यांचाही पत्ता कट करत भाजपने ईराण्णा कडाडी यांना उमेदवारी दिली हे विशेष होय. 32 वर्षे भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून सेवा केलेल्याचे हे फळ असून ही निवड आपण कार्यकर्त्यांना समर्पित करत आहोत, असे ईराण्णा कडाडली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
कर्नाटकातील येत्या 19 जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी वास्तविक भाजपच्या बेळगाव विभागाने प्रभाकर कोरे यांची उमेदवारी सुचवले होती. राज्यसभेच्या पदासाठी रमेश कत्ती सुद्धा इच्छुक होते. आपले बंधू रमेश यांना राज्यसभेचे तिकीट मिळावे यासाठी विद्यमान आमदार उमेश कत्ती यांनी आपली पूर्ण ताकद लावली होती. परंतु कत्ती व कोरे या दोघांनाही डावलून भाजपने ईराण्णा कडाडी यांना उमेदवारी दिली. नेहमीप्रमाणे आपल्या धक्कातंत्राचा प्रत्यय आणून देणाऱ्या ईराण्णा कडाडी यांची गेल्या 32 वर्षापासून भाजपचे निष्ठावंत आणि स्वच्छ चारित्र्याचे कार्यकर्ते म्हणून ओळख आहे.
बेळगाव जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि मृदुभाषी म्हणून ओळखले जाणारे ईराण्णा कडाडी यांची पक्षांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रामाणिक चारित्र्यवान अशी प्रतिमा आहे. 1994 मध्ये अरभावी येथून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली परंतु ते अयशस्वी ठरले. 2018 च्या बेळगाव विधानसभेच्या आणि त्यानंतर 2019 च्या लोकसभाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी बेळगाव विभागाचे इन्चार्ज म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या निवडीने समस्त भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधान पसरले आहे.
भाजपने आपल्याला उमेदवारी दिली आहे. आपण प्रभाकर कोरे आणि रमेश कत्ती यांचे मार्गदर्शन घेतच पुढे आलो आहोत. प्रभाकर कोरे यांना यापेक्षाही मोठे पद देण्याची पक्षाची इच्छा असावी, यासाठी यावेळी त्यांना तिकीट देण्यात आलेले नसावे अशा शब्दात ईराण्णा कडाडी यांनी आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.