बेळगाव शहरातील कचऱ्याची उचल करण्यासाठी नव्याने खरेदी करण्यात आलेल्या आणि सुमारे 15 दिवस धूळखात पडून असलेल्या चार कचरावाहू कॉम्पॅक्ट ट्रक गाड्यांचे उद्घाटन व शुभारंभाचा कार्यक्रम अखेर आज सोमवारी सकाळी पार पडला.
बेळगाव महापालिका कार्यालय आवारात सोमवारी सकाळी आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी उपस्थित होते. या उभयतांच्या हस्ते प्रारंभी नव्या कचरावाहू गाड्यांचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर फित कापून उद्घाटन केले गेले. त्याचप्रमाणे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी हिरवा बावटा दाखवून कचरावाहू कॉम्पॅक्ट ट्रक गाड्यांच्या सेवेचा शुभारंभ केला.
याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी, महापालिका आयुक्त जगदीश के. एच., भाजप युवा नेते किरण जाधव, मनपा स्वच्छता निरीक्षक उत्तम गणाचारी आदी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शहरातील स्वच्छतेचे काम अधिक वेगाने व्हावे यासाठी महापालिकेने कचरा उचल करणाऱ्या या चार कॉम्पॅक्ट ट्रक गाड्यांची खरेदी केली आहे. गेले सुमारे 15 दिवस कचऱ्याची उचल करणाऱ्या या गाड्या महापालिका कार्यालय आवारात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धुळखात थांबून होत्या.
त्यामुळे सध्याच्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या काळात महापालिका आवारात एकाच ठिकाणी थांबून असलेल्या या नव्या कोऱ्या कॉम्पॅक्ट ट्रकगाड्या महापालिकेत ये – जा करणाऱ्या नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनल्या होता. मात्र आज अखेर पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून या कचरा गाड्या कार्यरत करण्यात आल्या आहेत.