भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकेकाळी देखभाल व सेवा करण्याचे भाग्य लाभलेली करोशी (ता. चिकोडी) येथील शतायुषी महिला जिगणबी बापूलाल पटेल यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.
निधन समयी त्यांचे वय 108 वर्षे होते. त्यांच्या पश्चात चार चिरंजीव, तीन कन्या, सुना व नातवंडे असा परिवार आहे. औरवाड (जि. कोल्हापूर) येथील मंदिर कमिटी आणि बाबूलाल पटेल कुटुंबीय यांच्यातील जमिनीचा खटला चिकोडी न्यायालयात सुरू होता.
तत्कालीन मुंबई हायकोर्टात प्रसिद्ध वकील असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पटेल कुटुंबियांची बाजू मांडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. हा खटला लढण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चिक्कोडीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांच्या निवास व जेवण खाण्याची सोय करोशी येथील बापूलाल पटेल यांच्या घरीच करण्यात आली होती. त्यावेळी जिगणबी यांना डॉ. आंबेडकर यांच्या सेवेचे भाग्य लाभले होते.