येत्या 19 जून रोजी होणाऱ्या कर्नाटकातील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नवी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी इराण्णा कडाडी आणि अशोक गस्ती या कमी आकर्षक उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे मात्र सध्या अडचणीत आले असून त्यांना पक्षांतर्गत असंतोषाला सामोरे जावे लागत असल्याचे समजते.
कर्नाटक राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राज्याच्या भाजप कमिटीने निवडलेल्या रमेश कत्ती व प्रभाकर कोरे या बड्या नेत्यांची नावे हे केंद्रातील हायकमांडने नाकारली आहेत. स्थानिक निवडीला प्राधान्य देणाऱ्या मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. बेंगलोर येथे प्रसारमाध्यमांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील हायकमांडने केलेली निवड ही “कार्यकर्त्यांसाठी भेट” आहे असे सांगितले. तसेच या निर्णयाबद्दल पंतप्रधान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धन्यवाद देऊन शुभेच्छा व्यक्त केल्याचेही सांगितले.
लिंगायत समाजातील इरांना कडाडी हे भाजपचे बेळगाव इन्चार्ज अर्थात प्रभारी आहेत, तर नाभिक समाजातून आलेले गस्ती हे बेळ्ळारी येथील भाजप प्रभारी आहेत. या उभयतांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे “पक्षात एखाद्या ठराविक नेत्याला महत्त्व नाही, तर पक्षनिष्ठा आणि विचारसरणी याला अधिक महत्त्व आहे हेच केंद्रातील हायकमांडच्या निवडीवरून स्पष्ट होत असल्याचे मत पक्षातील ज्येष्ठ मंडळींकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान राज्यसभेच्या तिकिटासाठी राज्यातील भाजपामध्ये झालेल्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या विरोधात पक्षांतर्गत असंतोष निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.