नृत्याचे वर्ग अर्थात डान्स क्लासेस पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी. तसेच आम्ही आर्थिक संकटात असल्यामुळे शासनाने मदत करावी अशा मागणीचे निवेदन बेळगाव डान्स असोसिएशनतर्फे आज सोमवारी जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आले.
बेळगाव डान्स असोसिएशनतर्फे सादर करण्यात आलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांना स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे गेल्या जवळपास तीन महिन्यापासून बेळगाव शहर परिसरातील नृत्याचे वर्ग अर्थात डान्स क्लासेस बंद आहेत. या डान्स क्लासवर नृत्य शिक्षक आणि प्रशिक्षकांची उपजीविका चालत असते.
त्याचप्रमाणे यापैकी बहुतांश शिक्षक भाडोत्री जागेत आपले नृत्याचे वर्ग घेत असतात. गेल्या तीन महिन्यापासून डान्स क्लासेस बंद असल्यामुळे आम्हा नृत्य शिक्षकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी त्याचप्रमाणे आमचा उदरनिर्वाह चालावा यासाठी मर्यादित संख्येने विद्यार्थ्यांना घेऊन डान्स क्लास सुरू करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करतेवेळी सुधीर कलपत्रे, विनायक केसरकर, विशाल, महेश जाधव आदींसह बेळगाव डान्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.