जगप्रसिद्ध संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्यावर निंदनीय टीका करणारे राष्ट्रीय वृत्त वाहिनीचे निवेदक आणि व्यवस्थापकीय संपादक अमिश देवगन यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी टिपू सुलतान संघर्ष समितीने केली आहे.
टिपू सुलतान संघर्ष समितीचे राज्य सचिव फैजल खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. न्यूज चॅनेलने गेल्या 15 जून 2020 रोजीच्या आरपार या कार्यक्रमात निवेदक व व्यवस्थापकीय संपादक अमिष देवगन यांनी जगद्विख्यात संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्यावर मानहानिकारक निंदनीय टीका केली आहे. समाजात असंतोष आणि देशात जातीय तणाव निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याने देवगन यांना तात्काळ अटक करण्यात यावे.
संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांना अमिष देवगण यांनी अहवेलना कारक संबोधण्याचा प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. पंतप्रधान कार्यालय, विरोधीपक्षनेते, अनेक मुख्यमंत्री हे इस्लाम धर्मातील या महान संताला दरवर्षी श्रद्धांजली वाहत असतात. ही वस्तुस्थिती असताना टीआरपी मिळवण्यासाठी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांचा अपमान करून देशात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी अमिश देवगन यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
बुधवारी निवेदन सादर करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी टिपू सुलतान संघर्ष समितीचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.