बेळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत अनेक जण बाहेरून येत असून ते कोरोना पॉझिटिव आढळत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती पावले उचलण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. त्यामुळे यापुढे बाहेरून येणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे सांगितले आहे.
हुक्केरी तालुक्यात कोरोना कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी यांनी आज हुक्केरी शहरात दाखल होऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी म्हणाले, हुक्केरी तालुक्यात नऊ कंटेनमेंट झोन करण्यात आले आहेत. कोरोना टास्क फोर्स कमिटीची जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणे लॉकडाउन करुन पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. ग्राम पंचायत पातळीवर, टास्क फोर्स पथकांना प्रशिक्षण देऊन प्रगती आढावा घ्यावा असे अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी म्हणाले, होम क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या व्यक्तींच्या घरांना, दररोज बीट पोलिसांनी भेट देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवावे, बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ . राजेंद्र के व्ही म्हणाले, विविध वसतिगृहांमध्ये क्वारंटाईन केलेल्या लोकांचा कालावधी संपून ज्यांना घरी पाठवण्यात येत आहे. त्यांच्या हातावर शिक्का मारुन त्याच्या घरावर पोस्टर चिकटवले पाहिजे आणि शेजारच्या लोकांचा फोन नंबर घेऊन त्यांच्या कायम संपर्कात राहावे.
बेळगाव जिल्हा कोरोना नोडल अधिकारी राजेंद्र चोळणं यांनी विविध अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सल्ला सूचना दिल्या. उपविभागीय अधिकारी अशोक तेली यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत करुन कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी घेत असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.
यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ . एस व्ही मुन्याळ, तहसीलदार अशोक गुरांनी, डीएसपी डी टी प्रभू, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ उदय कुडची, बीईओ मोहन दंडीन, कृषी विभागाचे सहाय्यक संचालक महादेव पतगुंडी, सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी, पीएसआय शिवानंद गडाद, रमेश, गणपती आदी उपस्थित होते.