कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. तथापि दुर्देवाने नागरिकांसह महापालिकेकडून देखील परिसर स्वच्छतेबाबतचे नियम कसे धाब्यावर बसवले जातात हे आज मंगळवारी टिळकवाडीत पहावयास मिळाले.
टिळकवाडी येथील देशमुख रोड या प्रमुख रस्त्यावरील सोमवार पेठेच्या कॉर्नरवर रजपुत बंधू हायस्कूल आवाराला लागून “स्वच्छमेव जयते” हा फलक लावण्यात आला आहे. क्लीन सिटी मुव्हमेंटच्या या फलकावर “कचरा टाकणे दंडनीय अपराध आहे”, असे नमूद केलेल्या या फलकाच्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला आहे.
वेळच्यावेळी कचऱ्याची उचल न केल्यामुळे भररस्त्यात शेजारी हा कचरा तसाच पडून असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. हा प्रकार या ठिकाणी सातत्याने घडत असतो. सध्या शाळा बंद असली तरी हा कचरा या ठिकाणी असाच साचत राहिला तर शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शाळा म्हणजे ज्ञान मंदिर परंतु या कचऱ्यामुळे रजपुत बंधू हायस्कूल या ज्ञानमंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. तेंव्हा महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे.