अनेक महान व्यक्तींच्या खून प्रकरणांचा तपास अजून सुरू आहे. मारेकऱ्यांना पुरवण्यात आलेली काडतुसे बेळगाव येथून गेली होती अशी धक्कादायक माहिती आहे, तरीही बेळगाव मधील काडतुसे विक्रीतील काळाबाजार अद्याप सुरू असल्याची चर्चा होत आहे. यासाठी पोलीस खात्याने काडतुसे विक्रीवर योग्य नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे.
काडतुसे खरेदी करण्यासाठी बेळगावमध्ये जितकी परवानगी आहे तितक्या प्रमाणापेक्षा फारच कमी खरेदी होते. यामुळे वैयक्तिक कोट्यातील उरलेली काडतुसे परस्पर गोव्याला विकली जातात तसेच गुन्हेगारी प्रकरणात वापरली जात असल्याची माहिती मिळत आहे.
यासाठी खरेदी विक्रीसाठी ठेवाव्या लागणाऱ्या रजिस्टर मध्ये फेरफार केली जात असून हा प्रकार ऑनलाईन व्हावा, खरेदीदाराचे बायोमेट्रिक घेतले जावेत आणि यावर पोलीस खात्याचे पूर्ण नियंत्रण असावे अशी जागरूक नागरिकांची मागणी आहे.
शेतकरी वर्गाला किमान 25 काडतुसे खरेदी करण्याची परवानगी आहे. पण ते 5 किंवा 10 काडतुसे घेतात. यावेळी त्याच्याकडून सही घेऊन उरलेली काडतुसे जास्त दराने काळ्या बाजारात विकली जात आहेत, असे ऐकायला मिळत आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तांनी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन वेळीच नियंत्रण आणावे लागणार आहे.