उत्तर प्रदेशातील आयोध्या (साकेत) येथे उत्खनना दरम्यान बौद्ध विहाराचे अवशेष आढळले आहेत. तेंव्हा साकेत – आयोध्या या ठिकाणाला बौद्ध स्मारक म्हणून घोषित करण्याबरोबरच तेथे सापडलेल्या बौद्ध अवशेषांचे जतन केले जावे, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखेने एका निवेदनाद्वारे राष्ट्रपतींकडे केली आहे.
भारतीय बौद्ध महासभा बेळगाव जिल्हा शाखेचे अध्यक्ष श्रवण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन राष्ट्रपतींकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आले. उत्तर प्रदेश येथील फैजाबाद जिल्ह्यातील आयोध्या (साकेत) येथे उत्खनना दरम्यान जमीन समतल करताना 2000 वर्षापूर्वीचे बुद्धाची मूर्ती, शिलालेख, धम्मचक्र आदी बौद्ध विहाराचे अवशेष आढळले आहेत. हे अवशेष प्राचीन असून अतिशय अनमोल आहेत.
त्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन तसेच संबंधित ठिकाणी बौद्ध विहार होते हे मान्य करून या प्राचीन स्मारकाचे जतन केले जावे. त्याचप्रमाणे आयोध्या (साकेत) हे ठिकाण बौद्ध स्मारक म्हणून घोषित केले जावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. संबंधित जागेचा राम जन्मभूमीशी काही ही संबंध नसून ती बुद्धाची जागा असल्याचे न्यायालयीन दाखले तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्र समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा संदर्भ निवेदनात देण्यात आला आहे. आपल्या मागणीला समस्त बौद्ध धर्मीयांसह कुशवाह, मौर्य, यादव, कोळी, कोरी, कुरमी, जटाव, माळी आदी इतर मागास जातींचा संपूर्ण पाठिंबा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर निवेदन सादर करतेवेळी बौद्ध महासभेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्रवण शिंदे यांच्यासह मललेश कुरंगी सरचिटणीस शिवाप्पा हळ्ळी, खजिनदार यमनाप्पा गडीनाईक आदींसह बहुसंख्य सदस्य व बौद्ध धर्मीय उपस्थित होते.