बेळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे येथील समस्याही डोके वर काढू लागले आहेत. दरम्यान विकसित बेळगावच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आता कामांना गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासन मात्र ढिम्म असून यापूर्वीच अनेक कामे अर्धवट पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.
बेळगाव शहराचा समावेश स्मार्टसिटीत झाल्यानंतर केवळ गाजावाजा करण्यात धन्यता मानणार्या अधिकाऱ्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊलच टाकले नाही. त्यामुळे बेळगावचा विकास खुंटला आहे. बेळगाव महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे याबाबत आता नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
बेळगाव शहराच्या विकासासाठी हजारो कोटी खर्च करण्यात आले आहेत. मात्र नेमके हा निधी कुठे खर्च करण्यात आला आणि या निधीतून कोणता विकास साधण्यात आला? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे याकडे आता गांभीर्याने पाहून रखडलेल्या कामांना गती देण्याच्या दृष्टीकोनातून पाऊल उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या शहरातील रस्त्यांच्या कामांना संथतीचे ग्रहण लागले आहे.
त्यामुळे अनेक रस्त्यावर बॅरिकेट घालून रस्ते अडविण्यात आले आहेत. याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे आणि गटारींची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.