बेळगाव ग्रामीणची समितीची मळणी गेली 15 वर्षे चालूच आहे. ना दाणे बाहेर पडत आहेत ना कडबा बाजूला होत आहे. नुसतं जुनेच पैलवान जमीन धरून पडून आहेत.ना त्यांच्यात कस राहिलाय, ना नवीन डाव त्यांना माहीत आहेत. नुसत्या नुरा कुस्ती खेळण्यात ते वेळ घालवत आहेत.
बेळगाव ग्रामीणची जनता या पडेल पैलवानांची कुस्ती बघून आता उबगली आहे. हे मैदान खाली करायला तयार नाहीत, आणि नविन पैलवानाला आत येऊन देत नाहीत.समिती म्हणजे मराठी जन माणसाची नस. खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी माणसाला ग्रामीण वर समितीचा भगवा फडकावा अशी आशा आहे, पण मामा भाचे स्वताच्या बंगल्यात राहून समितीच्या कार्यकर्त्यांच्या झोपडीत दिवाही लागून देत नाहीत.वर्षांनूवर्षे हेच मामा भाच्याचे पडेल चेहरे बघून माणसच काय म्हसरं सुद्धा तोंड फिरवत आहेत.
नव्या नेतृत्वाला जागा करून ध्यावी हे यांच्या गावीही नाही.समितीचा भगवा मानाने ग्रामीण वर फडकायचा असेल तर हॅट्ट्रिकवीर ‘मामाचे ‘उच्चाटन करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ असे भाच्याला सांगणे गरजेचे आहे.ग्रामीणच्या मातीची कुस ही पिकाऊ आहे, अनेक लढाऊ कार्यकर्त्यांची ती खाण आहे. पण हे झारीतील शुक्राचार्य पहिल्यांदा बाजूला करणे गरजेचे आहे.
गेल्या पंधरा वर्षात परप्रांतातून आलेल्यानी, मामा भाच्याच्या कलगीतुऱ्यात बाजी मारत ग्रामीण वर राज्य केले.कोल्हापूर मधून आलेल्या दादाने दहा वर्षे राज्य केले. दादा कर्तृत्ववान निघाला नाही म्हणून जनतेने खानापूरहुन आलेल्या ताईला संधी दिली.दोघेही मराठीचे विरोधक. मामा भाच्याचा भांडणात खुर्चीवर बसले, आणि समितीला घात लावत समितीच्या कार्यकर्त्यांची त्यांनी लूट केली.
समितीच्या नावावरचे सगळे फायदे मिळवलेल्या व पद भोगलेल्या या मामाची नीती ही खायचे एकाचे आणि गायचे दुसऱ्याचे अशी आहे. समितीचा उमेदवार प्रचारात पुढे व निकालात मागे अस होण्याचं काय कारण? हा देखील यांच्या विचार तत्वाच्या कसा भाग आहे हा संशोधनाचा विषय आहे.समितीचा निखारा विझवण्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. विझलेल्या राखेत फुक मारून आग पेटवतो म्हणून केलेला यांचा एल्गार जनता ओळखून चुकली आहे.एकंदर समितीच्या नेत्यानीच आता ही जुनाट झालेली नाणी बाजूला काढली पाहिजे, आणि फाटक्या नोटा झिजवट घेणाऱ्या बाजारात देऊन टाकली पाहिजेत .ही चलनी नाणी सध्या चालत नसली तरी यांनी आपल्या जुने कर्तृत्व सांगत एकी करतो म्हणून सांगत मांडवली करून पैसे खाल्याचे किस्से ग्रामीण मध्ये रंगत आहेत. समिती ही एक विचारसरणी आहे. दीर्घकाळ चाललेले आंदोलन आहे. हे मराठी भाषिकांच्या हितासाठी काम करणारे आंदोलन आहे. 64 वर्षे चालत आलेली चळवळ आहे. जर का या आंदोलनाला पुढे करून एकीच्या नावाखाली राष्ट्रीय पक्षाकडून मालिदा मिळवायचा असेल तर जनता हे सहन करणार नाही.
ग्रामीण भागातील जनतेने गेली 15 वर्षे तीन अंकी नाटक बघितलं आहे. आता त्यांचा नवीन नवीन फार्स चालू आहे पण दिग्दर्शकांनी नाटकातील विदूषकासह पात्र बदलली पाहिजेत अशी इच्छा व्यक्त होत आहे.