बेळगाव जिल्हा शिक्षण विभाग सध्या एका समस्येमुळे त्रस्त झाला आहे. संपूर्ण शिक्षण खात्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना पर्यायाने शिक्षण खात्यालाच कॉरंटाईन होण्याची वेळ येणार आहे, अशी भीती निर्माण झाली आहे. एका महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे ही समस्या निर्माण होणार असल्याची शक्यता असून याबद्दल शैक्षणिक वर्तुळात चर्चा सुरू आहे.
शिक्षण खात्याशी संबंधित एका महत्त्वाच्या कार्यालयातील शिपाई पदावर काम करणार्या महिलेचा मुलगा राजस्थान येथून परतला आहे. राजस्थान येथे कामाला असलेला मुलगा कर्नाटकात दाखल झाल्यानंतर त्याला होम कॉरंटाईन करण्यात आले. मात्र त्याची आई असलेली शिपाई महिला आपल्या कार्यालयात येतच होती . त्या कार्यालयात येत असलेल्या शिपाई महिलेला महत्त्वाच्या पदावरील अधिकारीने वेळेतच ऑफिसला येणे बंद करायला हवे होते. तसे न करता बरेच दिवस कार्यालयात कामावर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला आणि तिला मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह येईपर्यंत कार्यालयात उपस्थित राहू नको. अशी सूचना करण्यात आली आहे.
त्या राजस्थान येथून परतलेल्या तरुणाचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो कोरोना पॉझिटिव आहे की निगेटिव हे स्पष्ट झालेले नाही.
तो जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या आईला कोरोना ची बाधा होऊ शकते. कारण त्याला होमकॉरंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित महिलेकडून त्या शिक्षण खात्यातील कार्यालयात कामाला येणाऱ्या व्यक्तींना कोरोना ची बाधा होऊ शकते. अशी चर्चा आहे.
संबंधित महिलेने शिक्षण खात्याशी संबंधित विविध बैठकांमध्ये चहापाणी देण्यापासून इतर अनेक प्रकारे वावर केला होता. त्यामुळे सध्या शिक्षण खात्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे अधिकारी चिंतेमध्ये आहेत. त्यामुळे त्या महिलेपासून आपल्याला कोरोना ची बाधा झाली आहे का? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून शिक्षकांकडे आणि शिक्षकांकडून पालकांकडे कोरोना ची लागण होऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ आहे.
संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने जबाबदारपणा दाखवून त्या महिलेचा मुलगा ज्या दिवशी आला त्या दिवसापासूनच त्या महिलेला कार्यालयात उपस्थित राहण्यापासून रोख लावणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. यामुळे संपूर्ण शिक्षण खाते आता अडचणीत येणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून बेळगाव जिल्हा प्रशासन, बेळगाव आरोग्य खाते तसेच संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षण खात्यातुन होत आहे. त्यामुळे यासंदर्भात जे जे कोणी संपर्कात आले त्या साऱ्यांचीच तपासणी करून शिक्षण खात्याला कोरोना ची बाधा होऊ नये याची काळजी घेण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात शिक्षण खात्यातील त्या अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन लागत नाही. आपल्याला स्वतःलाही बाधा होऊ शकते त्या महिलेने गोंधळ घातला असे सांगून त्या अधिकाऱ्यांनी हात वर करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा असून त्या बेजबाबदार अधिकाऱ्याचा बंदोबस्त करा अशी मागणी होत आहे.