बेळगाव शहरात पावसाळ्यात निर्माण होणारी पूर परिस्थिती टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून जुन्या पी. बी. रोड हिंद इंजिनिअरिंगपर्यंतच्या लेंडी नाल्याची तात्काळ साफ-सफाई करण्याबरोबरच नाल्या शेजारील झाडे झुडपे काढून नाला रुंद करण्याचा आदेश महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात शहरातून वाहणारा लेंडी नाला तुंबून पूर परिस्थिती निर्माण होत असते. यासंदर्भात बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन बेळगाव महापालिका आयुक्त जगदीश के एच यांनी मंगळवारी शहराबाहेरील लेंडी नाल्याचा पाहणी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात दरम्यान नारायण सावंत यांनी केलेल्या सूचना आणि नाल्याच्या एकंदर परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन मनपा आयुक्तांनी पूना – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून ते जुन्या पी. बी. रोड येथील हिंद इंजिनिअरिंगपर्यंतच्या लेंडी नाल्याचे रुंदीकरण करण्याबरोबरच नाल्या शेजारील झाडे-झुडपे हटविण्याचा आदेश दिला आहे.
मनपा आयुक्तांच्या पाहणी दौर्याप्रसंगी बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, इराण्णा कळसण्णावर, सुनील खन्नूकर, सुनील जाधव, महापालिकेच्या अभियंत्या मंजुश्री, एम. डी. अरिफ, अनिल माने आदी उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत यांनी “बेळगाव लाईव्ह” कडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, पावसाळ्यात लेंडी नाल्यात पाणी तुंबून पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी या नाल्याची साफसफाई करण्याबरोबरच या ठिकाणीची अतिक्रमणे हटविणे गरजेचे आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय महामार्गनजीक ज्या ठिकाणी लेंडी नाला व बेळ्ळारी नाला मिळतो त्या ठिकाणी राष्ट्रिय महामार्गाखाली नाल्यातील पाणी निचरा होण्यासाठी घालण्यात आलेले सर्व पाईप खुले असणे गरजेचे आहे. सध्या या सोळा पाईपांपैकी फक्त आठ पाईप खुले आहेत. जोपर्यंत शहराबाहेरील लेंडी नाल्यांची साफसफाई आणि रुंदीकरण होत नाही, तोपर्यंत कोनवाळ गल्लीपासूनच्या शहरात असणाऱ्या लेंडी नाल्यांची साफसफाई करण्यात काहीच अर्थ नाही, असे नारायण सावंत यांनी स्पष्ट केले.
लेंडी नाल्यासह बेळ्ळारी नाल्यामुळे शहर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्यास नाल्यात अतिक्रमण करणारे कांही शेतकरी बांधवही कारणीभूत असल्याची खंत सामंत यांनी व्यक्त केली. तथापि संबंधित नाल्यांमुळे यंदा शेतकरी बांधवांना पूर परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ येऊ नये यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिल्याचे नारायण सावंत यांनी सांगितले.